विश्रांतवाडी (प्रतिनिधी) : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आमरण उपोषण करणारे मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कळसमध्ये एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. कळसमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून आळंदी रस्त्यावरील धर्मवीर संभाजीराजे चौकातील आंदोलन स्थळापर्यंत मोर्चा देखील काढण्यात आला.
यामध्ये हातात भगवे झेंडे व भगव्या टोप्या घालून मराठा समाजातील लहान मुले, महिला भगिनी, ज्येष्ठ नागरिक, युवक व सर्वपक्षीय नेतेमंडळी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. राज्य व केंद्र सरकारने इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठी समाजास ओबीसी कोट्यातून लवकरात लवकर आरक्षण द्यावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
समस्त लिंगायत समाजाच्यावतीने शिवयोगी प्रतिष्ठानचे नरेंद्र बिडवे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकारी शशी साटोटे, वंचित बहुजन आघाडी विश्रांतवाडी शाखेचे पदाधिकरी तसेच विविध सामाजिक संघटनांनी आरक्षणासाठी सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठींबा दिला.
आजवर लढलो मातीसाठी.. एकदा लढूया जातीसाठी असे म्हणत कळस परिसरातील सकल मराठा समाज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी एकवटला होता. एक मराठा…लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं…नाही कुणाच्या बापाचं, जय भवानी..जय शिवराय, स्वराज्यरक्षक संभाजी महाराज की जय या घोषणा आंदोलनकर्त्यांनी दिल्या.
या उपोषणात प्रकाश म्हस्के, अमृत म्हस्के,बाबासाहेब धापटे, विठ्ठलराव देवकर, सतीश म्हस्के,लक्ष्मण देवकर,ऍड.राजाभाऊ धापटे, दिनेश म्हस्के, शशिकांत देवकर, काशिनाथ तरस, बाबा शेळके, मुरलीधर शंकर, महादेव मोरे, बबनराव तोडकर, राहुल म्हस्के, अभिजित सुर्वे, हर्णेश देवकर सहभागी झाले होते या सर्वांनी आंदोलनाला पाठिंबा दिला.