शिक्रापूर – सध्या देशभरात ड्रग्ज प्रकरण तापत असताना सध्या मुंबई व पुणे जिल्ह्यात मोठी टोळी कार्यरत असल्याचे बोलले जात आहे. शिरुर तालुक्यातील मिडगुलवाडी येथे नार्कोटिक्स विभागाच्या पथकाने छापा टाकत कंपनीवर केलेल्या कारवाईमध्ये तब्बल 174 किलो ड्रग्ज जप्त करुन कंपनी सील करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या कारवाईने शिरूर तालुका हा ड्रग्जच्या लिस्टवर आला आहे. हा अड्डा कारवाईच्या रडारवर आल्याने अमली पदार्थांची पाळेमुळे खोलवर रूजल्याचे दिसून येत आहे.
मिडगुलवाडी (ता. शिरुर) येथे एका फिनेल बनवणाऱ्या कंपनीवर नार्कोटिक्स विभागाच्या पथकाने शिक्रापूर पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गोपनीय पद्धतीने छापा टाकला. मात्र, यावेळी पोलिसांना कोणतीही माहिती देण्यात आली नाही. याठिकाणी छापा टाकत तब्बल तीस तासांहून अधिक कारवाई सुरु ठेवण्यात आल्याने पोलीस देखील चक्रावून गेले, दरम्यान, येथे मोठ्या प्रमाणात केमिकल आढळून आल्याने कोणालाही काही समजत नव्हते तर गावातील लोक या पत्र्याच्या शेडमध्ये फरशी पुसण्याचे फिनेल हे केमिकल बनवले जात असल्याचे सांगू लागले.
हे शेड व कंपनी अतिशय जंगलात असल्याने कोणालाही काही माहिती नव्हती तर कंपनीच्या कडेने असलेले पत्रा कंपाउंडचे गेट देखील कधीही उघडे दिसले नव्हते. नार्कोटिक्स विभागाच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात तब्बल 174 किलो अल्प्राझोलम नामक ड्रग्ज व आदी साहित्य जप्त करुन संपूर्ण कंपनीचे मुख्य शटर तसेच गेट सील केले आहे.
यावेळी दोघांना अटक करण्यात आली आहे मात्र, नार्कोटिक्स विभागाकडून कारवाई करीत असताना शिक्रापूर पोलिसांना देखील कोणतीही माहिती दिली नाही. याविभागाने केलेल्या कारवाईमध्ये शेकडो लिटर केमिकल ओतून देत काही साहित्य जाळून नष्ट केले आहे. त्या कंपनीचे शेड मागे केलेल्या मोठ्या दोन खड्डयामध्ये काही केमिकल व ड्रग्ज सदृश पदार्थ दिसत असून शेडच्या परिसरात सध्या उग्र वास येत आहे. मात्र, कारवाईने शिरुर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
ललित पाटील प्रकरणाशी काही संबंध आहे ?
पुणे जिल्ह्यात सध्या ललित पाटील प्रकरण चांगलेच तापले असताना पुणे जिल्ह्यातच नारायणगाव व मिडगुलवाडी या दोन्ही ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्जसाठा जप्त केला गेल्याने या घटनेशी ललित पाटील याचा काही संबंध आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. संबंधित विभाग त्यादिशेने कसून तपास करीत असल्याची चर्चा आहे.
फिनेलच्या नावाखाली ड्रग्ज निर्मिती
मिडगुलवाडी येथे दुर्गम भागातील शेतात पत्र्याचे मोठे शेड व त्याला पत्र्याचे कंपाउंड मारून त्यामध्ये फरशी पुसण्याचे फिनेल बनवल्याने भासवून काही नागरिकांना फिनेल देऊ करत तेथे आतमध्ये चक्क अल्प्राझोलम ड्रग्ज बनवले जात असल्याचे समोर आले आहे.
मिडगुलवाडीच्या शेजारी अनेक पत्रा शेड
मिडगुलवाडीनजीक कान्हूर मेसाई, हिवरे कुंभार, खैरेवाडी येथील अनेक ठिकाणी दुर्गम भागात कुदळवाडी भागातील अनेक व्यावसायिकांनी जागा खरेदी करीत मोठमोठे पत्रा शेड मारुन तेथे दुर्गम भागात कोणतेतरी व्यवसाय उभारल्याचे दाखवले असताना त्याबाबत देखील आता शंका उपस्थित केली जात आहे