Bihar Police : पोलिसांवर लोक डोळे झाकून विश्वास ठेवतात असे म्हटले जाते कारण त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा सर्वजण करतात. पण कधी कधी अशा काही घटना समोर येतात त्यामुळे कोणावर विश्वास ठेवायचा हाच मोठा प्रश्न निर्माण होतो. दरम्यान, अशीच एक घटना बिहारमध्ये घडली आहे. ज्यामुळे मन सुन्न होत. अपघातस्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह थेट पुलावरून खाली ओढ्यात फेकून दिल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिलेल्या वृत्तानुसार हा व्हिडीओ बिहारमधला आहे. बिहारच्या मुझफ्फरपूरमधल्या फाकुली ओपी भागातली ही घटना आहे. या परिसरातील धोधी ओढ्यावरच्या पुलावर एक अपघात घडल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ८ ऑक्टोबर रोजी, अर्थात रविवारी ही घटना घडली आहे. पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, मृतदेहाचे काही भाग व कपडे एकात-एक अडकले होते. ते काढणं अशक्य झाल्यामुळे ते बाजूच्या ओढ्यात फेकून देण्यात आले.
बिहार पुलिस की शर्मनाक करतूत, सड़क दुर्घटना में मृत शख्स के शव को उठाकर नहर में फेंका.
📍फकुली, मुजफ्फरपुर pic.twitter.com/fE7CRMYo3R
— Utkarsh Singh (@UtkarshSingh_) October 8, 2023
घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये काही पोलीस एक मृतदेह रस्त्यावरून फरपटत नेताना दिसत आहेत. एका पुलावर हे पोलीस असून त्यांनी मृतदेह पुलाच्या कठड्यावरून खाली ओढ्यात फेकून दिल्याचंही व्हिडीओत दिसत आहे.
धक्कादायक बाब म्हणजे हे सगळं घडत असताना आसपासच्या नागरिकांनी फक्त बघ्याची भूमिका घेतल्याचं दिसत आहे. शिवाय, मृतदेह फेकून मागे फिरणारे पोलीस एखादी कचऱ्याची पिशवी खाली फेकल्याच्या आविर्भावात निवांत असल्याचंही व्हिडीओत दिसत आहे. दरम्यान, अशा प्रकारे मृतदेह किंवा मृतदेहाचे भाग ओढ्यात फेकून देण्याची मानसिकता असणाऱ्या पोलिसांवर टीका होऊ लागली आहे बिहार पोलिसांच्या या अमानवी कृत्यावरून सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.