हांगझोऊ :- आशियाई क्रीडा स्पर्धेतील हॉकीत भारताच्या महिला संघाने पुरुष संघाच्याच कामगिरीचा कित्ता गिरवताना बुधवारी सिंगापूरवर तब्बल 13-0 असा विजय मिळवला. भारताच्या संगीता कुमारीने गोलची हॅट्ट्रिक साधताना सिंगापूरच्या बचावाला कमकुवत ठरवले.
भारतीय महिला हॉकी संघाने सिंगापूरचा धुव्वा उडवताना गोलचा वर्षाव केला. संगीता कुमारीने हॅटट्रिक साधली. तिला साथ देताना नवनीत कौरने दोन गोल केले. तसेच दीपिका, सुशिला चानू, उदिता, नेहा, दीप ग्रेस एक्का, सलीमा तेते, वंदना कटारिया व मोनिका यांनी प्रत्येकी एक गोल केला.
सामना सुरू झाल्यावर पहिल्याच क्वार्टरमध्ये भारताने 5-0 अशी भक्कम आघाडी घेतली होती. दुसऱ्या क्वार्टरमध्ये सिंगापूरने लढत देण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही भारताने तीन गोल केले. तिसऱ्या क्वार्टरमध्ये सिंगापूरने आक्रमक खेळ केला. मात्र, त्यांना भारताचा बचाव भेदण्यात यश आले नाही.
भारताने मात्र आणखी एक गोल करत त्यांच्यावरील दडपण वाढवले. अखेरच्या चौथ्या क्वार्टरमध्ये भारताने तब्बल चार गोल केले. सिंगापूरला या संपूर्ण सामन्यात भारताने गोल करण्याची एकही संधी दिली नाही, आणि हा सामना 13-0 असा जिंकला. आता भारतीय महिला संघाचा सामना मलेशियाविरुद्ध येत्या शुक्रवारी होणार आहे.