मुंबई :- भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आज जे यश मिळवताना दिसत आहे, त्यामागे माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या पाठिंब्याचा खूप मोठा वाटा आहे, असे मत धोनीबाबत कायमच वादग्रस्त वक्तव्ये करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या माजी कसोटी क्रिकेटपटू गौतम गंभीरने केले आहे. त्यामुळे आता अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
रोहितच्या या यशात तसेच एकूणच आतापर्यंतच्या प्रवासात धोनीचा मोठा वाटा आहे. धोनीमुळेच रोहित आज संघात आहे. सुरुवातीच्या काळात रोहितला धोनीनेच भक्कम पाठिंबा दिला. त्यावेळी रोहित अडखळत होता. त्याच्या धावा होत नव्हत्या. मात्र, तरीही धोनीने त्याच्यावर विश्वास दाखवला व त्याचे संघातील स्थान कायम राहील याकडे लक्ष दिले व यातूनच आजचा रोहित घडला आहे.
धोनीनेच त्याला सलामीवीर म्हणून संधी दिली. 2013 साली धोनीने त्याला संधी दिली आणि त्यानंतर रोहित सातत्याने यश मिळवत आहे. आता रोहित भारतीय संघाचा कर्णधारही झाला. रोहितला मधल्या फळीतून सलामीला बढती दिल्यानंतर रोहितची कामगिरी सरस होऊ लागली, असेही गंभीर म्हणाला.
2011 साली झालेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेचे विजेतेपद धोनीमुळेच मिळाले असे जेव्हा सगळेच बोलत होते त्यावेळी गंभीरने धोनीवर टीका करण्याची एकही संधी सोडली नव्हती. आताही धोनीचा संदर्भ आला तर गंभीर टीकाच करतो, मात्र, यावेळीच त्याने रोहितबाबत मत व्यक्त करताना धोनीचे केलेले कौतुक अनेकांसाठी आश्चर्याची बाब ठरत आहे.