रांजणगाव गणपती: श्रीक्षेत्र रांजणगाव महागणपती मंदिरातील द्वारयात्रेची अतिशय भक्तिमय व मांगल्यमय वातावरणात सांगता झाली असल्याची माहिती देवस्थानच्या अध्यक्षा स्वाती पाचुंदकर यांनी दिली.
रांजणगाव देवस्थानचे मुख्य विश्वस्त ओंकार देव व रुपाली देव यांच्या हस्ते महापूजा याग करुन पहाटे चार वाजता मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करुन देण्यात आले. शनिवार (दि.16) ते मंगळवार दि.19 या कालावधीत द्वारयात्रा सुरु होती. या द्वारयात्रेची आज सांगता झाली. पारंपारिक प्रथेनुसार द्वारयात्रेला गणेश जयंतीच्या आधी चार दिवस श्रींच्या उत्सव मूर्तीची पालखीतून वाजत गाजत मिरवणूक काढून ही पालखी बहिणीला भेटण्यासाठी नेली जात. हा पालखीचा मान गावातील पाचुंदकर आळी, माळीआळी, लांडे आळी व शेळके आळी यांना दिला जातो.
पहिल्या दिवशी पालखीचे पूर्वद्वार यात्रेकरिता करडे गावाकडे दोनलाई देवीच्या भेटीसाठी प्रस्थान केले. पालखीचे मानकरी पाचुंदकर आळी हे होते. दुसऱ्या दिवशी पालखीचे प्रस्थान दक्षिणद्वार यात्रेकरिता निमगाव म्हाळुंगी गावाकडे शिरसाई देवीच्या भेटीसाठी प्रस्थान केले. पालखीचे मानकरी माळी आळी हे होते. तिसऱ्या दिवशी पालखीचे पश्चिमद्वार यात्रेकरिता गणेगाव खालसा गावाकडे ओझराई देवीच्या भेटीसाठी प्रस्थान केले. पालखीचे मानकरी लांडे आळी हे होते. चौथ्यादिवशी पालखीचे उत्तरद्वार यात्रेकरिता ढोकसांगवी गावाकडे मुक्ताई देवीच्या भेटीसाठी प्रस्थान केले. पालखीचे मानकरी शेळके आळी हे होते.
या अंगारकी विनायक चतुर्थीचे औचित्य साधून आनंदराव दिनकरराव पाचुंदकर पाटील यांच्या वतीने भाविकांसाठी फराळ उपलब्ध करुन दिला. अप्पर पोलीस अधिक्षक मितेश गट्टे यांनी महागणपतीचे दर्शन घेऊन भाविकांच्या सुविधा व सुरक्षा याबाबत पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्याकडून कामकाजाचा आढावा घेतला. द्वारयात्रेमुळे मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. लाखो भाविकांनी महागणपतीच्या दर्शनाचा लाभ घेतला असल्याचे देवस्थान ट्रस्ट व पोलीस प्रशासनाने सांगितले.
एक उपविभागीय अधिकारी, दोन पोलीस निरीक्षक, सात पोलीस उपनिरीक्षक, 70 पोलीस कर्मचारी, रेस्क्यू टीमचे जवान असा फौजफाटा भाविकांच्या सुविधेसाठी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. द्वारयात्रा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट, रांजणगाव गणपती, करडे, निमगाव म्हाळुंगी, गणेगाव खालसा व ढोकसांगवी ग्रामपंचायत, पोलीस प्रशासन यांचे सहकार्य मिळाले आहे. द्वारयात्रा करणाऱ्या द्वारकरी व भाविकांसाठी रांजणगाव गणपती, करडे, निमगाव म्हाळुंगी, गणेगाव खालसा व ढोकसांगवी ग्रामपंचायतींनी व दानशूर अन्नदात्यांनी फराळ, चहा व पिण्याचे पाणी उपलब्ध करुन दिले.