मुंबई – शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेच्या विषयावर निर्णय घेण्यास आपण नाहक उशिर करणार नाही आणि त्यात आम्हाला स्वारस्यही नाहीं पण या प्रक्रियेत घिसाडघाई करून त्याचा न्याय देण्याच्या प्रक्रियेवरही आपण परिणाम होऊ देणार नाही असे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटले आहे. यावेळी नार्वेकर पत्रकारांशी बोलत होते.
“वाजवी वेळेत याचिकांवर निर्णय घेण्याचे निर्देश असूनही आतापर्यंत काहीही केले गेले नाही” अशी टीका सर्वोच्च न्यायालयाने या बाबतीत केली आहे त्याबद्दल विचारले असता,
नार्वेकर म्हणाले की नियम आणि घटनात्मक तरतुदींचे पालन केल्यानंतर लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल. मला सर्वोच्च न्यायालयाची प्रत मिळालेली नाही. न्यायालयात काय घडले ते मला माहीत नाही.
मला त्या ऑर्डरमधील मजकुराची माहिती नाही. न्यायालयाच्या आदेशाचे अवलोकन केल्यानंतरच मी यावर भाष्य करू शकेन, असे ते म्हणाले.
शक्य तितक्या लवकर आपण यावर निर्णय घेऊ असेही नार्वेकर यांनी यावेळी नमूद केले. अपात्रतेच्या विषयावर एक आठवड्याच्या आत निर्णय देण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली आहे.