पिंपरी – दक्षिण भारतीय बांधवांचे नववर्ष अर्थात ओणम हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी मल्याळी महिलांनी पारंपरिक नृत्य सादर करून फुलांच्या रांगोळीतून चांद्रयान – 3 ची प्रतिकृती सादर केली.
ओणम हा सण दक्षिण भारतीयांचा मुख्य सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ओणम ज्याला मल्याळम भाषेत तिरुवोनम असेही म्हणतात, हा 10 दिवसांचा उत्सव 20 ऑगस्ट रोजी सुरू झाला. पिंपरी चिंचवड शहरात व्यावसायानिमित्त दक्षिण भारतीय बांधव मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असून त्यांनी निगडी येथील श्रीकृष्ण मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
ओणमनिमित्त निगडी येथील श्रीकृष्ण मंदिरात मल्याळी बांधवांनी विविध कार्यक्रम सादर केले. या वेळी पारंपरिक वाद्य वादन करून महिलांनी नृत्य केले. तसेच फुलांची रांगोळी अर्थात फुलकम काढली. या रांगोळीतही चांद्रयान – 3 ची प्रतिकृती साकरण्यात आली होती. फुलांच्या रांगोळीलाही विशेष महत्त्व आहे. तसेच मंदिरात पारंपरिक वस्त्र परिधान करून महिलांनी फेर धरत नृत्य केले. पारंपरिक वाद्याचे वादन करण्यात आले. मंदिरात विधीवत पूजा करण्यात आली. त्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. दक्षिण भारतीय बांधवांनी मंदिरात गर्दी केली होती.
सणाचे महत्त्व
शेतात चांगले पीक येण्यासाठी तसेच केरळमध्ये महाबली नावाचा राजा होता असे म्हणतात. त्यांच्या सन्मानार्थच ओणम सण साजरा केला जातो. तसेच भगवान विष्णूच्या वामन अवतारालाही समर्पित आहे. या उत्सवात लोक 10 दिवस फुलांनी घर सजवतात आणि विधीनुसार भगवान विष्णू आणि महाबली यांची पूजा करतात. ओणम हा सण चिंगम महिन्यात साजरा केला जातो. मल्याळम लोक चिंगम हा वर्षाचा पहिला महिना मानतात. तर, इंग्रजी महिन्यानुसार, चिंगम महिना ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये येतो. ओणमच्या प्रत्येक दिवसाला विशेष महत्त्व आहे.