पुणे -प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी पुणे मेट्रोच्या फुगेवाडी ते सिव्हील कोर्ट आणि गरवारे कॉलेज ते रुबी हॉल मार्गिकेचे लोकार्पण होत आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रुबी हॉल, सिव्हिल कोर्ट आणि शिवाजीनगर मेट्रो स्थानकांची पाहणी केली. शिवाय, रुबी हॉल स्थानक ते शिवाजीनगर मेट्रो स्थानकादरम्यान प्रवासदेखील केला.
विभागीय आयुक्त सौरभ राव, मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, मेट्रोचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत सोनवणे यांच्यासह मुरलीधर मोहोळ, राजेश पांडे उपस्थित होते. या दोन मार्गांमुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरे जोडले जाणार असून, महत्त्वाच्या ठिकाणी प्रवासदेखील सुलभ होणार आहे. नवीन मार्ग शिवाजीनगर, सिव्हिल कोर्ट, आरटीओ, पुणे स्टेशन, पीएमसी, छत्रपती संभाजी महाराज उद्यान,
डेक्कन इत्यादी महत्त्वाच्या भागांना जोडत आहे. त्यामुळे पुणेकरांना याचा फायदा होणार आहे.
मेट्रो मार्गामुळे पुणेकरांना प्रवासाचा चांगला पर्याय उपलब्ध होणार आहे. शहरातील वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होईल. नागरिकांना मेट्रो स्थानकापर्यंत प्रवास करण्यासाठी ई-बस आणि पार्किंगची सुविधादेखील असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी मेट्रोद्वारे प्रवास करावा. – चंद्रकांत पाटील, पालकमंत्री, पुणे