पाटणा – बिहार सरकारने या सत्रापासून राज्यातील सर्व वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये मुलींसाठी 33 टक्के जागा राखीव ठेवल्या आहेत. सध्या हा नियम फक्त सरकारी महाविद्यालयांमध्येच लागू असेल. यासाठी ऑनलाइन नोंदणीसह निवड प्रक्रिया सुरू केली आहे.
बिहारमधील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 1150 एमबीबीएस आणि डेंटलच्या जागा आहेत, त्यामध्ये केंद्रीय कोट्यातील 15 टक्के जागा आहेत. नव्या धोरणानुसार आता 380 जागा विद्यार्थिनींसाठी राखीव असतील. केंद्रीय कोट्यातून नोंदणी पूर्ण झाल्यानंतर राज्य कोट्यातून एमबीबीएससाठी प्रवेश घेतला जाईल. त्याचबरोबर अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये 2810 जागा वाढल्या आहेत. म्हणजेच आता जागांची संख्या 13675 झाली आहे. यामध्ये 4500 विद्यार्थिनींसाठी जागा राखीव आहेत. अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया या आठवड्यापासूनच सुरू होणार आहे.
दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारमधील अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये किमान 33% (एक तृतीयांश) जागा मुलींसाठी राखीव ठेवण्याची घोषणा केली होती. बिहार अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये मुलींसाठी किमान एक तृतीयांश जागा राखीव ठेवल्यास या महाविद्यालयांमधील विद्यार्थिनींची संख्या आणखी वाढेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते.
यामुळे विद्यार्थिनी उच्च व तंत्रशिक्षणाकडे अधिक प्रवृत्त होतील, असा सरकारचा अंदाज आहे. त्यानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालये सुरू होत आहेत. अनेक वैद्यकीय महाविद्यालयेही नव्याने सुरू झाली आहेत. बिहारमधील मुला-मुलींना अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी बाहेरगावी जावे लागू नये, हा आमचा उद्देश असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते.