स्वित्झर्लंड दोन गोष्टींसाठी ओळखले जाते एक म्हणजे पैसा साठवून ठेवण्यासाठी उपलब्ध असणाऱ्या बँका आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या देशात उत्पादित होणारी घड्याळे.
काळाच्या ओघात आता पारंपारिक घड्याळे मागे पडू लागली आहेत. लोक घड्याळाऐवजी वेळ पाहण्यासाठी मोबाईलचा वापर करू लागले आहेत किंवा स्मार्ट वॉचला पसंती देऊ लागले आहेत. असे असले तरीही आजही स्वित्झर्लंड मधील कंपन्यांनी उत्पादित केलेली ब्रॅण्डेड महागडी घड्याळे जगभर विकली जातात. भारतातही क्रिकेटपटू अभिनेते आणि श्रीमंतांना अशा घड्याळांचे आकर्षण आहे. अनेकदा मनगटावर स्वित्झर्लंड मधील एखाद्या कंपनीचे घड्याळ असले म्हणजे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाते. दुसरीकडे भारतातही अनेक कंपन्या स्वित्झर्लंडच्या ब्रँडेड घड्याळांच्या तोडीस तोड स्वदेशी घड्याळे उत्पादन करत असल्या तरीही सेलिब्रेटी आणि श्रीमंतांना मात्र स्विस घड्याळांचे आकर्षण आहे.
१) स्वित्झर्लंडमधील ब्रँडेड कंपन्यांच्या घड्याळांवर प्रीमियम प्राइस टॅग असतो .म्हणजेच ही घड्याळे अतिशय महाग असतात. तरी देखील 2023 च्या पहिल्या सहा महिन्यात भारतातील स्विस घड्याळाच्या विक्रीमध्ये 21 टक्क्यांनी वाढ झालेली दिसते.
२) फेडरेशन ऑफ द स्विस वॉच इंडस्ट्री ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जानेवारी ते जून 2023 या कालावधीत भारतात स्वित्झर्लंडमधील ब्रँडेड कंपन्यांची एकूण 933 कोटी रुपये किमतीची घड्याळे निर्यात करण्यात आलेली आहेत. स्विस फ्रॅंक चलनात विचार केला तर हे मूल्य 98.5 दशलक्ष स्विस फ्रॅंक एवढे आहे.
३) भारतातील उच्चभ्रूंसाठीच्या मॉलमध्ये या घड्याळांची प्रामुख्याने विक्री होते. उदाहरण द्यायचे तर दिल्लीतील द चाणक्य आणि एम्पोरिओ या मॉल मधील स्विस घड्याळाच्या विक्रीच्या वाढीचा वेग 80 ते 100% आहे.
४) आंतरराष्ट्रीय पातळीवर विचार केला तर दरवर्षी जगभरात 13.3 अब्ज स्विस फ्रॅंक एवढ्या मूल्याच्या घड्याळांची विक्री जानेवारी ते जून 2023 या कालावधीत झालेली आहे. जानेवारी ते जून 2022 मधील विक्रीचा विचार करता यावर्षीच्या विक्रीत 11.8 टक्क्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील वाढ झालेली दिसते.
५) सुप्रसिद्ध स्विस ब्रँड्समध्ये रोलेक्स, ओमेगा, टॅग हेअर, पातेक फिलिप, ऑडमार्स पिजेट आणि टीसॉट या ब्रँडचा समावेश होतो. या ब्रँडच्या आलिशान घड्याळांची किंमत दहा हजारांपासून सुरुवात होते. लाँजिन्स आणि टॅग हेअर अशा ब्रँडच्या घड्याळाच्या किमती तर लाखो रुपये असतात.
या घड्याळांचे आकर्षण का?
स्वित्झर्लंडमधील घड्याळे एकतर दिसण्यास अतिशय आकर्षक असतात. त्याखेरीज ही घड्याळे खरेदी करण्यामागे अनेक कारणे असतात.
१) गुणवत्ता आणि कलाकुसर – स्वित्झर्लंडमधील कंपन्यांची घड्याळे जगभर गुणवत्ता आणि कमालीच्या कलाकुसरी बद्दल ओळखली जातात. घड्याळांच्या उत्पादनात अभियांत्रिकीचा अतिशय काळजीपूर्वक आणि अचूकपणे वापर केलेला असतो. जेणेकरून प्रत्येक बारकाव्याकडे आणि तपशीलाकडे पुरेपूर लक्ष दिले जावे. त्यामुळेच धनाढ्य ग्राहकांना अशा प्रीमियम घड्याळांची भुरळ पडते.
२) प्रतिष्ठेचे लक्षण – ही घड्याळे विदेशात उत्पादित होतात आणि आपण खरेदी करतो तेव्हा तो पैसा स्वित्झर्लंडमध्ये जातो याचा विचार न करता केवळ प्रतिष्ठेचे लक्षण म्हणून अनेक भारतीय स्विस ब्रँडची घड्याळे वापरतात .जणू काही स्विस ब्रँडच्या घड्याळ म्हणजे त्यांची कामगिरी सामाजिक प्रतिष्ठा दर्शवणारे चिन्ह असावे असे अनेकांना वाटते.
३) सेलिब्रिटी कडून जाहिरातबाजी – स्विस ब्रँडच्या अनेक घड्याळांच्या ब्रँडची जाहिरात भारतातील अनेक खेळाडू, अभिनेते, क्रिकेटपटू नेहमी करत असतात. अशा सेलिब्रिटींच्या जाहिरातबाजी मुळे स्विस घड्याळांच्या लोकप्रियतेत आणखीनच भर पडते. अभिनेत्री करीना कपूर, दाक्षिणात्य अभिनेता रामचरण ते अगदी एम एस धोनी पर्यंत अनेक जण स्वित्झर्लंड मधील ब्रँडच्या घड्याळांची जाहिरात करत असतात. त्याचा स्वाभाविक प्रभाव ग्राहकांवर पडतो.
४) गुंतवणूक मूल्य – काही महागड्या वस्तूंचे गुणवत्ता मूल्य असते. स्विस ब्रँडची महागडी घड्याळे खरेदी करताना देखील काही भारतीय ग्राहक त्याच्याकडे गुंतवणूक म्हणून पाहतात. घड्याळांची काही मॉडेल्स आणि लिमिटेड एडिशन्स यांना काळाच्या ओघात चांगले मूल्य प्राप्त होते. तसेच त्यांना चांगली मागणी देखील असते.
५) ब्रँडची प्रतिष्ठा – अनेक शतके स्वित्झर्लंडमध्ये अतिशय कलाकुसरीने आणि काळजीपूर्वक घड्याळांचे उत्पादन केले जात असल्याने स्वित्झर्लंड मधील घड्याळाच्या ब्रँड्सला जगभर मोठी प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे. त्याचबरोबर या ब्रँड्सना एलिट क्राउड्सशी जोडले जाते. त्यामुळे केवळ प्रतिष्ठेपोटी अनेक जण या घड्याळांकडे आकर्षित होतात.
६) भेट संस्कृती – भारतात उच्चभ्रू वर्गात स्विस घड्याळे भेट देण्याची एक संस्कृती विकसित झालेली आहे. स्विस घड्याळ भेट देणे म्हणजे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाते. विशेष प्रसंगी किंवा वाढदिवसाला, सणांना अशा प्रकारची घड्याळे भेट देण्याची पद्धत एलिट क्लासमध्ये रूढ झालेली आहे. त्यामुळे या घड्याळांच्या लोकप्रियतेत आणखीनच भर पडते.