मुंबई :– उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून सुरू करण्यात आलेल्या नवीन पॉडकास्टच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांची एक मुलाखत घेण्यात आली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे. मुलाखतीचा पहिला भाग प्रदर्शित झाला आहे. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर तसेच शिंदे गटावर पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधला आहे. यावरून आता सर्वच भाजपच्या नेत्यांकङून उद्धव ठाकरेंवर सङकून टीका केली जात आहे.
“मी, माझा पेपर, स्वकियांशी माझा झालेला सामना, मीच संपादक, माझाच मुलाखतकार,माझीच मुलाखत… भन्नाट! ” अशी खोचक प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर दिली आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे.
बावनकुळे यांनी पुढे म्हटले आहे की,हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांची ज्वलंत मशाल कलानगर शेजारील मिठी नदीत विझवून सोनिया गांधींच्या सेनेसमोर मुजरा करणारे उद्धव ठाकरे आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर टीका करत आहेत. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नेतृत्वात देश सुरक्षित आहे.
तुम्हाला तुमच्या आमदारांचं नेतृत्व करता आलं नाही. ते तुमच्या नाकर्तेपणामुळे नाकाखालून निघून गेले. मुख्यमंत्री असताना तुम्ही मातोश्री बाहेर पडले नाहीत आणि आता लोकांना दोष देत आहात.
कुटनीतीला कुटण्याची भाषा तुम्हाला शोभत नाही. कारण 2019 साली युतीत निवडणूक लढून तुम्ही महागद्दारी केली आणि महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. तेव्हांच तुम्ही नितीमत्ता पायाखाली तुडवली होती. त्यामुळे घरात बसून निती-अनितीच्या गप्पा तुम्ही मारु नका.
घराणेशाही टिकवण्यासाठी एकत्र आलेल्या ‘इस्ट इंडिया‘ कंपनीचं कडबोळं आता लोकशाही टिकवण्याच्या गप्पा मारत आहेत. मी, माझं कुटुंब आणि माझा मुलगा एवढाच विचार करणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या तोंडून लोकशाही वाचवण्याच्या गप्पा ऐकणं म्हणजे मोठा विनोदच आहे, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर हल्लाबोल केला आहे.