अमरावती : राज्यात शिंदे-भाजप यांच्यासोबत हातमिळवणी करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत सामील झाले आहे. या नव्या राजकीय समीकरणानंतर राज्यात धमक्यांचे सत्र सुरु झाले आहेत. मागील दोन दिवसात दोन मोठ्या नेत्यांना धमक्या आल्यानंतर आता आणखी एका आमदाराला जीवे मारण्याची धमकी आली आहे. बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांना छत्रपती संभाजीनगर येथील एका व्यक्तीने अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
रवी राणा यांच्या स्वीय सहायकाने याविषयीची तक्रार राजापेठ पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. रवी राणा यांच्या मोबाईलवर संभाजीनगर येथील एका व्यक्तीने संपर्क साधला. महाराष्ट्रात फिरणे बंद करा, अन्यथा तुमच्या जिवाचे बरेवाईट करू, अचानक काही घडले किंवा अपघात झाला, तर काही म्हणू नका. तुमच्यावर मी व माझे कार्यकर्ते लवकरच हल्ला करणार आहेत.
तुम्हाला आम्ही सोडणार नाही. आमच्या विरोधात कसे काय बोलता, हे आम्ही अमरावतीत येऊन दाखवून देऊ. आता थांबले नाही, तर तुम्हाला संपवून टाकू, अशा धमक्या दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
रवी राणा यांचे स्वीय सहायक विनोद गुहे यांनी राजापेठ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सीमा दाताळकर यांच्याकडे यासंदर्भात लेखी तक्रार दाखल केली असून धमकी देणाऱ्या व्यक्तीला तात्काळ अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.