मुंबई : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांना थेट धमकी देत ‘तू निवडून कसा येतो, तेच बघतो. अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे, मी ठरवलं तर एखाद्याला आमदार होऊच देत नाही,’ असे विधान अजित पवारांनी शिवतारेंना उद्देशून केले होते.पवारांनी दिलेल्या धमकीनंतर विजय शिवतारेंचा पराभवही झाला होता. या प्रकरणानंतर अजित पवार आणि विजय शिवतारे यांच्यात वारंवार शाब्दिक चकमक होत होती. मात्र आता अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड पुकारून शिंदे-भाजपचा हात धरल्यानंतर आता विजय शिवतारेंची भाषा बदलली असल्याचे समोर येत आहे.
एका आठवड्यापूर्वीअजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करून आपल्यासोबत ८ नेत्यांना घेऊन सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतला. याच मोठ्या घडामोडीनंतर आता विजय शिवतारेंचा सूर बदलला आहे. एका वृत्तवहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी अजित पवारांवर स्तुतीसुमने उधळली आहेत. एवढंच नाही तर अजित पवार हा माझा आवडीचा नेता आहे, असेही ते म्हणाले.
राज्यातील राजकीय वातावरणाविषयी बोलताना विजय शिवतारे यांनी,“अजित पवार हे कार्यक्षम नेते आहेत. याबद्दल काहीच वाद नाही. मी त्यांचा विरोधक होतो. मी अनेकदा त्यांच्यावर टीका केली. पण काही बाबतीत मी त्यांचा प्रशंसक आहे. लोकांची कामं करणं, कार्यकर्त्यांना ताकद देणे, हे अजितदादांना चांगलं जमतं. महाविकास आघाडीच्या काळात त्यांनी काही लोकांना डावललं होतं. पण ते त्यांच्या कार्यकर्त्यांना ताकद देत होते. त्यांना मोठं करत होते. आता ते इथे आल्यावर युतीच्या सर्वच कार्यकर्त्यांना मदत करतील.”
त्याच बरोबर “महाराष्ट्रात सध्या एकनाथ शिंदेंसारखा मैदानात काम करणारा आणि लोकांसाठी संवेदना असणारा मुख्यमंत्री आहे. देवेंद्र फडणवीसांसारखे मॉडर्न चाणक्य आहे. खरं तर, शरद पवारांना राजकारणातील चाणक्य म्हणायचे, पण शरद पवारांच्या पुढचं ‘डिजीटल व्हर्जन’ देवेंद्र फडणवीस आहेत. त्यामध्ये आता अजित पवारांच्या रुपाने दुधात साखर पडली आहे. हे तिन्ही नेते मिळून निश्चितपणे महाराष्ट्राच्या हिताचं काम करतील. राजकारणातील अंतर्गत बाबींबद्दल मी फार बोलणार नाही. पण एक चांगला धडाडीचा नेता युतीत सामील झाल्यामुळे त्यांच्याबरोबरचे सर्व तरुण मंडळी महाराष्ट्राच्या विकासात चांगलं योगदान देतील.” असा विश्वासदेखील यावेळी विजय शिवतारे यांनी व्यक्त केला.
“मुख्यमंत्र्यांनी स्वागत केल्यानंतर मीही पहिल्याच दिवशी अजित पवारांचं स्वागत केलं. अजित पवार हे माझे आवडीचे नेते आहेत. मागच्या काळात आमच्या एकमेकांच्या काही चुका झाल्या. कर्तृत्व, स्पष्टपणा, परखड भूमिका असा माझा स्वभाव आहे. तसाच अजित पवारांचा स्वभाव आहे. दोघांच्या स्वभावात साम्य असल्यामुळे आमची जवळीक होती. आता ते युतीत सामील झाल्यामुळे पुणे जिल्ह्यात काम करायला एक वेगळ्या प्रकारची ताकद मिळेल,” असेदेखील शिवतारेंनी म्हटले.