मुंबई – माजी मंत्री व रयत क्रांतीचे संस्थापक सदाभाऊ खोत यांची शरद पवार यांच्यावर टीका करताना जीभ घसरली. सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांचा ‘सैतान’ म्हणून उल्लेख केला आहे. “शरद पवार हे सैतान आहेत. ते गावगाड्याकडे पुन्हा येता कामा नये, ही कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. पुतण्यापासून मला वाचवा अशी हाक शरद पवार देत आहेत. जे घडत आहे, तो नियतीने उगवलेला सूड आहे”, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर केली.
आता यावर त्यांनी स्पष्टीकरण देत आपली भूमिका मांडली आहे, सदाभाऊ खोत म्हणाले,’माझ्याकडून अनावधानाने सैतान हा शब्द गेला. गावगाड्यांमध्ये सैतान हा शब्द सहज वापरला जातो. माझी गावगाड्यातील भाषा इंडियातील लोकांना प्रस्थापितांना कडवट लागली. मला सेनापती गावगाड्याकडे येत आहे त्याला रोखूया, असं म्हणायचं होतं. सरदारांची जमवाजमव होता कामा नये ही त्यामागची माझी भूमिका होती’
दरम्यान, शरद पवार यांनीदेखील समृद्धी महामार्गावर अपघात झाला त्यावेळेस काही लोक देवेंद्रवासी झाले असा शब्दप्रयोग केला होता. पण त्यांना हा शब्दप्रयोग करायचा नसावा. शरद पवार यांनी तो अनावधानाने केला होता. म्हणून तुम्ही आता गोळ्या घालणार का? कारण गुण्यागोविंदाने शिवसेना-भाजप सरकार नांदत असताना यामध्ये तोडाफोडी कोणी केली? याचा इतिहास तपासावा लागेल, असा निशाणाही सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर साधला होता.