पुणे – रुग्णांना अतितत्परतेने वैद्यकीय मदत मिळावी आणि प्राण वाचवता यावेत, यासाठी ससून सर्वोपचार रुग्णालयात लवकरच “कोड ब्लू’ स्थापन केला जाणार आहे. वैद्यकीय अहवाल मिळाल्यावर 10 मिनिटांच्या आत वैद्यकीय मदत देण्यासाठी ही “कोड ब्लू’ची टीम सज्ज असणार आहे. अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी याविषयी माहिती दिली.
या विशेष टीममध्ये सहा परिचारिका, तीन डॉक्टर आणि तीन इंटेन्सिव्हिस्ट यांचा समावेश केला जाणार आहे. ज्या रुग्णांना हृदयविकाराचा तीव्र झटका येतो त्यांना तातडीने आयसीयूमध्ये दाखल करावे लागते. तत्पूर्वी प्राथमिक उपचार देण्यात येतात. हे उपचार देणारी टीम ही तज्ज्ञ असे तर रुग्णाचा जीव वाचू शकतो. आयसीयूमध्ये दाखल होईपर्यंत जागेवर वैद्यकीय उपचार देण्यासाठी टीमची मदत होणार आहे.
स्ट्रेचरवर घेऊन आयसीयू बेड उपलब्ध आहे की नाही, हे पडताळून तेथपर्यंत घेऊन जाईपर्यंत रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. अशी परिस्थिती टाळण्यासाठी रुग्णाला तातडीने जागेवर उपचार मिळावेत, यासाठी “कोड ब्लू’ टीम सज्ज ठेवली जाणार आहे. अशाप्रकारची सेवा देणारे ससून राज्यातील पहिले रुग्णालय ठरणार आहे