Buldhana Bus Accident : बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात होऊन २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. दरम्यान, टायर फुटल्याने बस अनियंत्रित होऊन दुभाजकाला धडकली त्यामुळे अचानक डिझेलच्या टाकीने पेट घेतला. या अपघातात २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. तर ८ प्रवाशी जखमी झाले आहेत.
समृद्धी महामार्गावरुन ही बस नागपूरहून पुण्याच्या दिशेने निघाली होती. जखमी प्रवाशांना बुलढाणा येथील सरकारी रुग्णालयात उपचारांसाठी हलवण्यात आले आहे. या घटनेने मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला असून मृतांना प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. त्याचबरोबर या अपघाताची चौकशी करण्याच्या सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यासोबतच मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्री अपघातस्थळी थोड्याच वेळात रवाना होणार आहेत.