Buldhana Bus Accident : समृद्धी महामार्गावर पिंपळखुटा येथे डिव्हायडरवर आदळल्याने बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात बसमधील 25 प्रवाशांचा जागीच होरपळून मृत्यू झाला आहे. तर चालकासह आठ जणांचे प्राण वाचले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बस पलटी झाली तेव्हा चालक आणि काही प्रवाशांनी बसच्या खिडक्या फोडल्या आणि बसमधून बाहेर पडले.
या घटनेनंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील या भीषण घटनेवर शोक व्यक्त केला. त्यांनी ट्वीट करत लिहिले की, “बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ समृद्धी महामार्गावर झालेल्या बसच्या अपघातात २५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी, वेदनादायी व दु:खद आहे. अपघातातील मृतांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. जखमींना लवकरात लवकर स्वास्थ्य मिळावे अशी प्रार्थना करतो. ईश्वर दिवंगतांना शांती प्रदान करो. माझ्या संवेदना शोकाकुल कुटुंबीयांसोबत आहेत.”
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ समृद्धी महामार्गावर झालेल्या बसच्या अपघातात २५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी, वेदनादायी व दु:खद आहे. अपघातातील मृतांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. जखमींना लवकरात लवकर स्वास्थ्य मिळावे अशी प्रार्थना करतो. ईश्वर दिवंगतांना शांती…
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) July 1, 2023
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या घटनेवर शोक व्यक्त करत मृतांना प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. याशिवाय जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करणार असल्याचेही सांगितले. या घटनेच्या चौकशीचे आदेशही त्यांच्याकडून देण्यात आले आहेत. सध्या या घटनेवर अनेक राजकीय नेते शोक व्यक्त करत आहेत.
दरम्यान, पोलिसांसमोर अपघातग्रस्त बसमधील मृत प्रवाशांची ओळख पटवण्याचं मोठं आव्हान आहे. ओळख पटवीण्यासाठी डीएनए टेस्ट शिवाय पर्याय नसल्याचे पोलीस यंत्रणेचे म्हणणे आहे. ही बस नागपूरहून निघाल्यामुळे खाजगी बस बुकिंग पॉईंट वरून ऑफिस मधून मृतांची नावं मिळण्यासाठी पोलीस यंत्रणा व प्रशासन प्रयत्न करत आहे.