Lok Sabha Election 2024 । लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता सरकार स्थापनेची तयारी सुरू आहे. एनडीएने सर्वानुमते नरेंद्र मोदी यांची नेता म्हणून निवड केली आहे. सूत्रांनी ही माहिती दिली आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील NDA मित्रपक्ष 7 जून रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत, जिथे ते नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्याचा दावा करतील. असे झाल्यास जवाहरलाल नेहरूंनंतर तिसऱ्यांदा पंतप्रधान होणारे नरेंद्र मोदी हे पहिले नेते ठरतील.
सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि तेलुगु देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांना नरेंद्र मोदींनी सरकार स्थापनेच्या प्रक्रियेवर वेगाने काम करावे अशी इच्छा आहे. बुधवारी झालेल्या एनडीएच्या बैठकीत सरकार स्थापनेवर चर्चा झाली. एनडीएच्या मित्रपक्षांना कोणती मंत्रिपदे द्यायची यावरही चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. टीडीपी आणि जेडीयूने गृह, संरक्षण, वित्त, रेल्वे यासारख्या मोठ्या मंत्रालयांच्या मागण्या मांडल्याचे वृत्त आहे.
‘सरकार स्थापनेत विलंब होता कामा नये’- नितीश कुमार
एनडीएच्या बैठकीदरम्यान नितीश कुमार कार्यवाहक पंतप्रधान नरेंद्र मोदींना म्हणाले, “लवकर करा. सरकार स्थापन करण्यात कोणताही विलंब होऊ नये. आम्ही ते लवकरात लवकर केले पाहिजे. त्यांच्या या विधानाने भाजपला आनंद होईल, कारण त्यांचा एनडीएतून बाहेर न जाण्याचा हा मोठा पुरावा आहे. बैठकीत NDA मित्रपक्षांनी एकमताने नरेंद्र मोदी यांची नेता म्हणून निवड केली. 21 एनडीए सदस्यांनी स्वाक्षरी केलेल्या ठरावात म्हटले आहे की, आम्ही सर्वानुमते नरेंद्र मोदींना आमचे नेते म्हणून निवडले आहे.
या बैठकीला नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि जेडीयू नेते लल्लन सिंग आणि संजय झा उपस्थित होते. एनडीएच्या बैठकीत सर्वांचे लक्ष जेडीयूचे नितीश कुमार आणि टीडीपीचे चंद्राबाबू नायडू यांच्याकडे होते, जे यावेळी सरकार स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.
जेडीयू आणि टीडीपीकडे किती जागा आहेत?
खरं तर, आंध्र प्रदेशात लोकसभेच्या 25 पैकी 16 जागा टीडीपीने जिंकल्या, तर बिहारमध्ये जेडीयूने 40 पैकी 12 जागा जिंकल्या. यावेळी भाजप केवळ 240 लोकसभेच्या जागा जिंकून बहुमतासाठी कमी पडला आहे. मित्रपक्षांच्या मदतीने एनडीएने 293 जागा मिळवून बहुमताचा आकडा पार केला आहे.