पुणे – राजस्थानमधील तीघांच्या टोळीने शहर आणि ग्रामीण भागातील किराणा मालांची दुकाने फोडण्याचे सत्र सुरु केले होते. ते किराणा मालाच्या दुकानातील तुप, सुकामेवा, महागडे साबण, मसाल्याचे पदार्थ, तेलाचे डबे आणि बिस्कीटे अशा महागड्या वस्तू चोरुन नेत होते. त्यांनी चोरलेल्या वस्तु लक्षात घेता पोलिसांनाही त्यामागचे कारण जाणून घेण्याची उत्सुकता होती. त्यांना जेरबंद केल्यावर पुढे आलेले कारण पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का देऊन गेले.
तीघेही आरोपी हे व्यापारी समाजातील आहेत. त्यांना किराणा मालाचे दुकान टाकायचे होते. मात्र पुरेसे भांडवल नसल्याने ते शक्य झाले नाही. यामुळे त्यांनी किराणा मालाची दुकाने टार्गेट करुन घरफोडी करण्यास सुरवात केली. चोरलेला माल ते आपल्याच समाजातील दुकानदारांना विकत होते. सुरेंद्र असलारामजी चौधरी (28), नेमाराम उर्फ डौलाराम चौधरी आणि भुंडाराम उर्फ राजु चौधरी (रा. ता.मारवाडी, जिल्हा झालोर, राजस्थान) अशी आरोपींची नावे आहेत.
कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरफोड्यांच्या अनुषंगाने पोलिसांचे एक पथक ग्रामीण भागातून येणारी वाहने रात्रगस्ती दरम्यान तपासत होते. त्यावेळी पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांना परराज्यातून येऊन घरफोडी करणाऱ्या टोळीचा प्रमुख साथीदारासह कोंढवा परिसरात येणार आहे, त्याने कोंढवा परिसरातून एक कारही चोरली असल्याची खबर मिळाली. त्यानूसार सापळा रचून खडी मशीन चौकात सुरेंद्र चौधरीला ताब्यात घेण्यात आले.
त्याच्याकडे केलेल्या कसून तपासात त्याने कोंढवा येथून एक इको कार, यवत येथील शोरुममधून स्वीफ्ट कार चोरल्याचे आणि किराणा दुकाने फोडल्याची केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून रोख रक्कम, एक पिकअप, एक मारुती आणि एक इको कार घरफोडीचे साहित्य असा आठ लाखाचा ऐवज हस्तगत करण्यात आला. त्याला मदत करणारे नेमाराण आणि भुंडाराम यांनाही ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या विरुध्द एकूण 21 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. नवी मुंबई पोलिसांनी एका गुन्हयांत त्यांच्यावर मोक्काची कारवाई केली होती. यातून जामिनावर सुटल्यावर त्यांनी पुन्हा गुन्हे करणे सुरु केले होते. त्यांच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात दोन लोणीकंद पोलीस ठाण्यात दोन, मंचर, भोसरी आणि यवतमध्ये प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे. त्यांनी या सर्व ठिकाणांवरुन तब्बल दहा लाखाचा किराणा माल चोरला आहे.
उपायुक्त विक्रम देशमुख, सहायक आयुक्त शाहुराव साळवे यांच्या मागदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक संजय मोगले, संदिप भोसले, सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, पोलीस अंमलदार अमोल हिरवे, गणेश चिंचकर, अभिजीत रत्नपारखी, सुहास मोरे, राहुल थोरात, विकास मरगळे, राहुल रासगे, राहुल वजारी यांच्या पथकाने केली.