कोलोंबो – जागतिक बॅंकेने श्रीलंकेला 700 दशलक्ष डॉलरचे कर्ज मंजूर केले आहे. सध्याच्या आर्थिक परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आणि देशातील गरीबांना मदत मिळावी म्हणून हे कर्ज मंजूर करण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून श्रीलंकेसाठी मार्च महिन्यात आर्थिक मदत देण्यात आली होती. त्यानंतरची ही आतापर्यंतची सर्वात मोठी आर्थिक मदत आहे.
गेल्या वर्षी श्रीलंकेच्या अर्थकारणापुढे मोठे आर्थिक संकट उभे राहिले होते. प्रचंड महागाईमुळे लोकांना आपल्या किमान गरजा पूर्ण करणेही शक्य होत नव्हते. त्यामुळे देशभर मोठे आंदोलनही झाले होते. त्याचा परिणाम म्हणून सत्तारुढ राजपक्षे कुटुंबाला सत्तेवरून पायउतार व्हावे लागले होते.
जागतिक बॅंकेने श्रीलंकेला मंजूर केलेल्या 700 दशलक्ष डॉलरच्या कर्जापैकी 500 दशलक्ष डॉलरचा निधी अर्थसंकल्पीय निधी म्हणून मंजूर करण्यात आला आहे. तर उर्वरित 200 दशलक्ष डॉलर सामाजिक सुरक्षेसाठी देण्यात येणार आहेत.