नवी दिल्ली – अभिनेते-राजकारणी कमल हसन यांनी कोईम्बतूरमधील एका महिला बस चालिकेला कार भेट दिली आहे. शर्मिला असं या महिला बस चालिकेचे नाव असून त्या कोईम्बतूरमधील पहिल्या महिला बस चालक आहेत. शर्मिला या खासदार कनिमोझी यांच्यासोबत तिकिटावरून झालेल्या वादामुळे चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. याच वादामुळे शर्मिला यांना आपल्या नोकरीचा राजीनामा देखील द्यावा लागला होता.
यावेळी कमल हसन यांनी शर्मिला यांना कार देण्यामागचे कारण सांगितले. ते म्हणाले की, ‘शर्मिलाबाबत नुकतच झालेल्या वादामुळे मला खूप वाईट वाटले. शर्मिला ही अनेक महिलांसाठी आदर्श आहे. या समाजात अजून अनेक शर्मिला असाव्यात असे माझे मत आहे. शर्मिला ही कार भाड्याने सेवेसाठी आणि उद्योजक बनण्यासाठी वापरू शकते.
द्रमुकच्या खासदार कनिमोझी करुणानिधी यांचे बसमध्ये प्रवास करताना तिकीट कापल्याच्या वादावर नाराज होऊन शर्मिला यांनी नोकरीचा राजीनामा दिला होता. बसमध्ये खासदार कनिमोझी यांच्याशी झालेल्या गैरवर्तनामुळे दुःख झाल्याचे त्यांनी सांगितले होत.
द्रमुक खासदार गांधीपुरम ते शहरातील पीलामेडू असा बसने प्रवास केला होता. त्यानंतर शर्मिलाने नोकरी सोडली, कारण तिच्या एका सहकाऱ्याने कनिमोझीचा अपमान केला होता आणि तिच्या कंपनीने तिच्यावर सेलिब्रिटींना बसमध्ये प्रवास करण्यासाठी आमंत्रित करून प्रसिद्धी मिळविण्याचा आरोप केला होता. याउलट खासदाराच्या प्रस्तावित भेटीची माहिती तिने तिच्या व्यवस्थापनाला दिली होती, असा दावा शर्मिला यांनी केला. दुसरीकडे वाहतूक कंपनीने अशी माहिती न मिळाल्याचे म्हंटले आहे.