नवी दिल्ली : भाजपा खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात सुरू असलेले आंदोलन कुस्तीगीरांनी अखेर मागे घेतले आहे. साक्षी मलिकने ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. यावरून कुस्तीगीर महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांनी एका वाक्यात उत्तर दिले आहे.
या प्रकरणाविषयी बोलताना ब्रिजभूषण सिंह यांनी, “हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे याप्रकरणी मला कोणतीही टिप्पणी आता करायची नाही. न्यायालय याप्रकरणी योग्य काम करेल”, इतकीच प्रतिक्रिया ब्रिजभूषण यांनी दिली. एका वृत्तवाहीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
भारतीय महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप ब्रिजभूषण सिंह यांच्यावर करण्यात आला होता. त्याप्रकरणी ब्रिजभूषण सिंह यांच्या अटकेची मागणी करत कुस्तीपटू पाच महिन्यांपासून आंदोलन करत होते. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहचले. सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिल्यानंतर दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी न्यायालयात चार्जशीटही दाखल करण्यात आली आहे.
— Sakshee Malikkh (@SakshiMalik) June 25, 2023
दरम्यान, साक्षी मलिकने ट्विट करत, “कुस्तीपटूंची ७ जूनला सरकारबरोबर बैठक झाली. या बैठकीत सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार लैंगिक शोषण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. दिल्ली पोलिसांनी तपास पूर्ण करत १५ जूनला चार्जशीट दाखल केलं आहे. त्यामुळे न्याय मिळेपर्यंत कुस्तीपटूंची रस्त्यावरील लढाई आता न्यायालयात सुरु राहिल.” असे म्हटले आहे.
पुढे “कुस्ती महासंघाच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. कुस्तीसंघाची ११ जुलैला निवडणूक होऊ शकते. सरकाराने दिलेल्या आश्वासनाच्या अंमलबजावणीची आम्ही वाट पाहू,” असेही साक्षी मलिकने म्हटले आहे.