पक्षाने केली हकालपट्टी; पोलिसांकडूनही कारवाई करत अटक
चेन्नई – तमिळनाडूमध्ये, द्रमुकचे नेते आणि प्रवक्ते शिवाजी कृष्णमूर्ती यांनी भाजपच्या महिला नेत्या आणि अभिनेत्री खुशबू सुंदर यांना ढोल म्हटल्याने वाद झाला. वाद वाढल्यानंतर रविवारी त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. तसेच काही तासांनंतर पोलिसांनीही त्यांना अटक केली.
3 जून रोजी कलैगनार करुणानिधी यांच्या वाढदिवशी शिवाजी यांनी तमिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी यांच्याबाबतही वादग्रस्त वक्तव्य केले होते. आम्ही दोन मंत्र्यांना काही खात्यांचे वाटप केले होते. राज्यपालांनी ते चुकीचे असल्याचे म्हटले. तर ते (राज्यपाल) काही बोलले तर त्यांनी त्यावर ठाम राहावे. त्यांनी खरंच आईच्या पोटी जन्म घेतला असता तर, ते शब्दावर ठाम राहिले असते. पण नंतर ते पलटले,असे त्यांनी म्हटले होते.
वक्तव्यावरून द्रमुकची संस्कृती कळते- खुशबू
खुशबू यांनी रविवारी ट्विटरवर शिवाजी यांचा एक अनव्हेरिफाईड व्हिडिओ शेअर केला. व्हिडिओमध्ये शिवाजी भाजप नेत्यांबाबत चुकीचे वक्तव्य करताना दिसत आहे. या वक्तव्यावरून द्रमुकमधील राजकीय संस्कृतीची माहिती मिळते, असे खुशबू यांनी ट्विटमध्ये म्हटले. या पक्षात त्यांच्यासारखे इतरही आहेत, असेही त्यांनी म्हटले. महिलांशी गैरवर्तन करून त्यांच्याबाबत अपमानास्पद वक्तव्ये करूनही त्यांना पक्षाकडून रोखले जात नाही, तर त्यांना बक्षीस देऊन संधी दिली जाते, असे त्या म्हणाल्या.