मुंबई – अभिनेत्री कंगणा राणावत तिच्या बेधडक वक्तव्यामुळे चांगलीच चर्चेत असते. अनेकदा ती काही बॉलीवूड कलाकरांवर देखील निशाणा साधते. आता तिने अभिनेता रणबीर कपूरवर टीका केली आहे. नाव न घेता तिने रणबीरवर ताशेरे ओढले आहेत. रामायणवर आधारित एका चित्रपटातील रामाच्या भूमिकेत बाॅलिवूड अभिनेता रणबीर कपूर, सीतेच्या भूमिकेत आलिया भट्ट आणि KGF स्टार यश रावणाच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. यावरूनच कंगणाने रणबीरवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.
कंगणाने इनस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत लिहिले की, ‘बॉलिवूडमध्ये आणखी एक रामायणावर चित्रपट येत असल्याची बातमी ऐकली. या चित्रपटात एक पांढरा उंदीर (तथाकथित अभिनेता) ज्याला थोड्या समजुतीची गरज आहे. जो पीआरच्या मदतीने बॉलीवूडमधील जवळजवळ प्रत्येक व्यक्तीबद्दल वाईट गोष्टी पसरवतो. वुमेनाइजिंग आणि ड्रग्जच्या व्यसनाधीनतेसाठी ओळखला जाणारा हा अभिनेता भगवान शंकराच्या ट्रायोलॉजीमध्ये (ज्याला कोणीही पाहिलं नाही किंवा याचे पुढील भाग पाहण्यासाठी इच्छुक नाहीत) स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता श्रीरामांची भूमिका साकारणार आहे.’
‘ज्याला स्वतःला भगवान शिव म्हणून सिद्ध करायचे आहे. त्याला आता भगवान राम बनायचे आहे. वाल्मिकीजींच्या वर्णनानुसार, ज्याचा रंग, रूप आणि वैशिष्ट्ये रामाशी तंतोतंत जुळतात, तो रावणाची भूमिका करत आहे. हे कलियुग आहे. कोणत्याही नशा करणाऱ्या व्यक्तीने रामाची भूमिका करू नये, जय श्री राम.’ असे कंगणाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे. यावरून अनेकांनी तिला पाठिंबा दर्शवला तर रणबीरच्या चाहत्यांना तिची ही पोस्ट रुचली नाही. सध्या कंगणाची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.