पिंपरी – स्मार्ट कार्ड अभावी गेल्या चार महिन्यांपासून वाहनपरवाना वाटप ठप्प झाला आहे. पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे (आरटीओ) वाहन परवान्यासाठी नोंदणी करून परीक्षा पास करुनही वाहन परवाना मिळण्यास अडचणी निर्माण होत आहेत. ज्या व्यक्तींचे वाहन परवाने पोस्टाद्वारे पाठविण्यात आले आहेत, त्यांनाही ते वेळेवर मिळत नाहीत. वाहन परवानाच्या प्रतिक्षेत अनेक नागरिक हेलपाटे मारून त्रस्त झाले आहेत. मात्र, वाहन परवाना प्रत्यक्षात मिळत नसला तरी केंद्र शासनातर्फे डीजी लॉकर ही प्रणाली विकसित केली असून या प्रणालीमध्ये परवाना डाऊनलोड करून ठेवल्यास कधीही त्याचा उपयोग करता येऊ शकतो, अशी माहिती पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे दररोज चारशे ते साडेचारशे वाहन परवान्यांची नोंदणी केली जाते. पिंपरी-चिंचवड आरटीओ कार्यालयात दुचाकी आणि चारचाकी मिळून महिन्याला किमान दहा हजार वाहन परवान्युुुाचे वाटप केले जाते. परंतु, सद्यःस्थितीत महिन्याला केवळ तीन ते चार हजारच वाहन परवान्याचे वाटप होत आहे. त्यामुळे किमान सहा हजार नागरिकांना वाहन परवान्यांसाठी वाट पहावी लागत आहे. 1 फेब्रुवारी 2023 पासून वाहन परवान्यांसाठी लागणारे स्मार्ट कार्ड पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने परवाना मिळणे मुश्कील झाले आहे.
वाहन परवान्यासाठी लागणारे स्मार्ट कार्ड तयार करण्याचे काम खासगी कंपनीला देण्यात आले आहे. ज्या प्रमाणात स्मार्ट उपलब्ध होणे गरजेचे आहे, त्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीत. परिणामी, सध्या राज्यभर वाहन परवाने देताना अडथळा निर्माण झाला आहे. मात्र, केंद्र शासनातर्फे डीजी लॉकर ही प्रणाली विकसित केली असून या प्रणालीमध्ये वाहन परवाना डाऊनलोड करून ठेवल्यास कधीही त्याचा उपयोग करता येऊ शकतो.
– अतुल आदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
कंपनीसोबतचा करार संपुष्टात
एका कंपनीला वाहन परवान्यासाठी लागणारे स्मार्ट कार्डचे काम दिले आहे. मात्र, संबंधित कंपनीबरोबर करण्यात आलेला करार संपला आहे. त्यामुळे स्मार्ट कार्ड उपलब्ध होत नाही. परिणामी, वाहन परवाने देण्याचे काम ठप्प झाले आहे. वाहन परवान्यासाठी आवश्यक शुल्क भरूनही परवाना मिळत नसल्याने चालकांना वाहन परवान्याची नोंदणीकृत “सॉफ्टकॉपी” घेऊन वाहने चालवावी लागतात. हा वाहन परवाना पोलीस गृहीत धरत नसल्याने अनेकांना दंडाचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.
डीजी लॉकरमध्ये परवाना डाऊनलोड करून ठेवा
केंद्र शासनातर्फे डीजी लॉकर प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीमध्ये केंद्र, राज्य शासनातर्फे नागरिकांना जारी करण्यात येणाऱ्या कागदपत्रांची डिजिटल कॉपी डीजी लॉकरमध्ये उपलब्ध आहे. अर्जदार त्यांचा आधार क्रमांक डीजी लॉकर बरोबर सलग्न करुन डीजी लॉकरमध्ये कोणतेही कागदपत्र जतन करुन ठेऊ शकतो. केंद्र शासनाच्या रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयातर्फे वाहन परवाना आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्राची डिजिटल कॉपी डीजी लॉकर मोबाइल ऍपव्दारे उपलब्ध करुन देण्याची सुविधा दिली आहे. ज्या ठिकाणी परवाना दाखविण्याची गरज आहे, त्याठिकाणी डीजी लॉकरमधील वाहन परवाना ग्राह्य असून वाहन चालक तो परवाना दाखवू शकतात.