खालापूर -मैदानी खेळामध्ये दांडपट्टा, खोखो, कबड्डी, बास्केटबॉल, हॉलीबॉल, फुटबॉल, लंगडी, भाला फेक, थाळी फेक, हॉकी, क्रिकेट, कुस्ती, धावणे आदी खेळ लुप्त होत आहेत. तर सध्या सोशल मीडिया व गेम्स झोनच्या जमान्यात मुलांना क्रीडांगणावरील खेळच माहिती नाहीत. त्यामुळे मुलांचा शारिरीक व बौद्धिक विकासच खुंटला जात असून बालपण ही हरवल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. त्यामुळेच पूर्वीचे बाळपण हे सर्वानाच रम्य वाटत असे.
पूर्वी शाळेच्या मधल्या सुट्टीत झाडावरच्या चिंचा पाडणे, लंगडी, लपाछपी, लगोरीचा असे किती तरी खेळ आहेत की जे आताच्या पिढीला माहित देखील नाहीत. क्रिकेटचा बॉल, पतंग किंवा गोट्या विकत घ्यायला जे पैसे लागत तेवढेच. पण ते ही मिळवणे काही सोपे नसे. कधी कधी तर नुसत्या पंचवीस पैश्याच्या क्रिकेटबॉलसाठी वर्गणी गोळा करावी लागे.
व्ही.सी.आर आणि विडीओ कॅसेटस भाड्याने आणून त्यावर हिंदी आणि मराठी चित्रपट पाहणे हा एक सामुहिक कार्यक्रम पूर्वी प्रसिध्द असे. गणपती महोत्सव, दही हंडी सारखे इतर सण देखील सर्व मुले फार उत्साहाने साजरे करीत असे. त्यामुळेच पूर्वीचे बाळपण हे सर्वाना रम्य बालपण वाटायचे.
पूर्वीच्या लोकांच्या आयुष्यातील बाळपणातील सोनेरी दिवस सर्वाच्या मनावर कायमच अधिराज्य करीत आहेत. अगदी चांदोबा मामा, झुक झुक आगिनगाडी, मामाचे पत्र हरवले, या गाण्यासारखेच ते दिवस बघता बघता सरून गेले. उरल्या त्या फक्त आठवणी. पण सर्वाना पुन्हा ते दिवस जगायच्या इच्छा होत असते. एक घास चिऊचा, एक घास काऊचा करत भरवलेला जेवणाचा घास आईच्या हातातून खावासा वाटतो, पुन्हा शाळेत जायचंय, मित्रांबरोबर खोड्या करायच्या, मधल्या सुट्टीत सगळ्यांबरोबर जेवणाचा डब्बा शेअर करायचा, शाळेच्या स्नेहसंमेलनात भाग घ्यायचा, पत्र्याची शिट्टी इतरांचा ओरडा पडेपर्यंत वाजवायची, चार आण्यात मिळणाऱ्या लिमलेटच्या गोळ्या शेंगदाण्याची चिक्की चन्यामन्या बोरं खायची, वडाच्या पारंब्यावर मनसोक्त झोके घ्यायचे, घोटीव पेपराच्या होड्या – विमाने बनवणे. तासन् तास रंगणारा नवा व्यापार खेळायचा असा विविध आठवणीतील पूर्वीचे बाळपण सर्वानाच हवाहवासा वाटतोय. मात्र इंटरनेटच्या जमान्यात आताच्या तरुणाईचे बाळपण हरवल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे.
आताच्या मुलांच्या समोर टीव्ही, संगणक, स्मार्टफोन आले आहेत. शिवाय दैनंदिन शाळा, खासगी शिकवणी, यामुळे जुने अस्सल खेळही हरविले आहेत. परंतु, आताच्या तरुणाईला मानसिक व शारीरिकदृष्ट्या मजबूत राहण्यासाठी खेळ खेळणे गरजेचे असून तरुणाईने मोबाइल अथवा इंटरनेटच्या दुनियेतून थोडासा वेळ काढून खेळ खेळल्यास पूर्वीचे बाळपण अनुभवायला मिळेल.
– वैशाली गायकर-दिसले, गृहीणी