मुंबई – बऱ्याच बैठकांनंतर अखेर कर्नाटकच्या पुढील मुख्यमंत्र्याच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. काँग्रेस हायकमांडने पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे कर्नाटकची कमान सोपवली आहे. सिद्धरामय्या हे दुसऱ्यांदा कर्नाटकचे मुख्यमंत्री होणार आहेत. तर शिवकुमार यांना राज्याचे उपमुख्यमंत्री केले जाणार आहे. कर्नाटकातील या राजकारणाचा प्रभाव आता महाराष्ट्रातील नेत्यांवर देखील पडताना दिसत आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शिवकुमार यांचे कौतुक करत एक ट्विट केले आहे.
शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्यामध्ये मुख्यमंत्रीपदावरून चुरस निर्माण झाली होती. अखेर काँग्रेसला मुख्यमंत्री पदाचा हा तिढा सोडवण्यात यश आले. आव्हाड यांनी याच मुद्द्यावरून शिवकुमार यांची पक्षनिष्ठा अधोरेखित करणारे ट्विट केले आहे.
आव्हाड आपल्या ट्विटमध्ये म्हणतात,”या माणसाकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे. त्याची बांधिलकी, त्याची निष्ठा.. तो ज्या प्रकारे पक्ष आणि नेत्याच्या पाठीशी उभा आहे.. आजकाल दुर्मीळ गुण आहेत” असं आव्हाड म्हणतात.
So much to learn from this man … his commitment his loyalty … the way he stands with the party and leader ship…. Rare Qualities now a days @DKShivakumar https://t.co/WZ5AobzMQ7
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 18, 2023
खरं तर सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यात मुख्यमंत्री पदावरून वाद सुरु होता. राहुल गांधींशी बोलणं झाल्यानंतर देखील शिवकुमार हे समाधानी नसल्याचं बोललं जात होत. मात्र सोनिया गांधींचा फोन आल्यानंतर शिवकुमार यांनी पक्षादेश मान्य केला आणि उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानलं. यावरूनच त्यांचं अनेकांनी कौतुक केलं आहे.