पुणे – राज्य शासनाने निवासी मिळकतींची 40 टक्के सवलत कायम ठेवल्याने पालिकेने दि. 15 मे च्या मध्यरात्रीपासून 7 लाख 68 हजार मिळकतींची बिले ऑनलाइन उपलब्ध करून दिली. त्यातील 6,164 मिळकतधारकांनी पहिल्याच दिवशी सुमारे 6 कोटी 62 लाख रुपयांचा कर पालिकेच्या तिजोरीत जमा केला आहे. दरम्यान, महापालिकेकडून दि. 19 ते 23 मे या कालावधीत छापील बिल पाठविण्यात येणार आहे.
याबाबत कर संकलन विभाग उपायुक्त डॉ. अजित देशमुख यांनी माहिती दिली. तर, महापालिकेच्या चॅटबॉट सुविधेद्वारेही पुणेकरांना मिळकतकराची बिले उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महापालिकेकडून शहरात दरवर्षी 1 एप्रिल पासून मिळकतकराची बिले नागरिकांना उपलब्ध करून दिली जातात. मात्र, या वर्षी राज्यशासनाकडे निवासी मिळकतींचा 40 टक्के सवलतीचा प्रस्ताव प्रलंबित असल्याने महापालिकेने अद्यापही बिले तयार केलेली नव्हती. मात्र, शासनाने ही सवलत कायम ठेवल्याने प्रशासनाला नव्याने बील तयार करावी लागली.त्यामुळे या वर्षी रविवारी (15 मे) मध्यरात्री पासून बिले ऑनलाइन पध्दतीने नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यानुसार, पहिल्याच दिवशी सुमारे 6164 मिळकतधारकांनी सुमारे 6 कोटी 62 लाख जमा केले आहेत. त्यात, 4 हजार 478 मिळकतधारकांनी 4 कोटी 88 लाख ऑनलाइन प्रणालीद्वारे भरले आहेत. तर, 1239 मिळकतधारकांनी 93 लाख रूपये करभरणा केंद्रावर रोख भरले असून, 447 मिळकतींचा सुमारे 80 लाखांचा कर धनादेशाद्वारे जमा करण्यात आला आहे.
मध्यरात्री 1 वाजता भरला कर
महापालिकेची मिळकतकराची बिले ऑनलाइन दिसू लागल्यानंतर रात्री 1 वाजून 6 मिनिटांनी पहिला ऑनलाइन कर महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे. ही कर रक्कम सुमारे 14 हजार 519 रूपयांची असून, मगरपट्टा सिटी परिसरातील मिळकतीचा हा कर आहे. त्यामुळे मिळकतकर भरण्याबाबत पुणेकरांची जागरूकता पुन्हा एकदा दिसून आली असून, पहिल्याच दिवशी महापालिकेस अपेक्षेपेक्षा अधिक कर जमा झाला आहे.
बिले पाच टक्क्यांनी वाढली
शासनाने निवासी मिळकतींना 40 टक्के सवलत कायम ठेवली असली तरी, शहरातील मिळकतींना महापालिका सरसकट देखभाल-दुरूस्तीचा खर्च म्हणून 15 टक्के सवलत देत होती. ती आता शासनाने 10 टक्के केली आहे. त्यामुळे, सर्व मिळकतधारकांचा कर 5 टक्क्यांनी वाढला आहे. नागरिकांना मागील वर्षीपेक्षा जास्त कर आल्याने महापालिकेकडे विचारणा करण्यात येत होती.