पुणे – पावसाळ्याच्या तोंडावर महापालिका आयुक्तांनी ड्रेनेज विभाग तसेच क्षेत्रीय कार्यालयांना 31 मे पूर्वी नाले सफाईची कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, मे महिना अर्धा संपला तरी शहरातील नाले सफाईची कामे अवघी 46 टक्के झाली आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात कामांचा वेग अत्यंत कमी असल्याने पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतल आहे. आयुक्तांनी केलेल्या पाहणीत नाले अर्धवटच साफ केल्याचे तसेच नाल्यांच्या परिसरात बेसुमार कचरा पडल्याचे आढळल्याने आयुक्तांनी अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले आहे.
मे महिन्याच्या सुरूवातीलाच आढावा बैठकीत महापालिका आयुक्तांनी प्रशासनास नाल्यांची कामे 31 मे पूर्वी करण्याचे आदेश दिले होते. त्यावेळी दोन महिन्यात केवळ 26 टक्के कामे झालेली होती. महिनाभरात उर्वरीत कामे होणार का असा प्रश्न होता? मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती पाहण्यासाठी पालिका आयुक्त रविवारी थेट मंगळवार पेठेत जन्म-मृत्यू दाखला कार्यालयापासून नाले सफाईची पाहणी सुरू केली. तेथून वैकुंठ स्मशानभूमी, फरशी पूल, गजानन महाराज मंदिर, अरणेश्वर मंदिर, के.के. मार्केट, लेकटाऊन, दोन्ही कात्रज तलाव, येवलेवाडी भैरोबानाला, कोंढवा स्मशानभूमी, आईमाता मंदिर बिबवेवाडी, मुकुंदनगर नाला, टिंबर मार्केट, लिंगायत स्मशानभूमी भवानी पेठ, घसेटी पूल, अल्पना टॉकीज या भागात या भागात पाहणी केली.
यावेळी अनेक ठिकाणी नाल्यांमधे मोठया प्रमाणात राडारोडा दिसून आला. तर अनेक ठिकाणी नाल्याच्या दोन मोऱ्या असताना एक मोरी पूर्णत: गाळाने भरल्याचे आढळून आले. त्यावेळी दाट लोकवस्ती आणि नाल्याची जागा छोटी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले, मात्र, हे काम करण्यास वेळ लागणार असल्याचे माहीत असतानाही आधी कामे का केली नाहीत या वरून पालिका आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे.