मुंबई – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला. यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळासह देशातील राजकारणात देखील हा विषय चर्चेचा झाला. यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी करायला सुरुवात केली. तसेच, शरद पवारांनी राजीनामा मागे घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी आंदोलन करायला सुरुवात केली. यानंतर आता राष्ट्रवादीच्या निवड समितीने शरद पवारांचा राजीनामा फेटाळला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्य्क्ष पदावरून शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. पक्षाला नवा अध्यक्ष कोण असेल यावरून चर्चा सुरु असताना आता शरद पवारांनीच अध्यक्ष राहावं असा बैठकीत ठराव मंजूर करण्यात आल्याचे समजते. दरम्यान, आता या सगळ्या घडामोळींवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा चार शब्दात आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘हा सिनेमा…’ असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
कर्नाटकात सध्या निवडणुकीचं वारं वाहतंय. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या प्रचारासाठी कर्नाटकात आहेत. तिथं माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीतील अंतर्गत घडामोडींवर भाष्य केल्याचं दिसून आलं आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा अंतर्गत चित्रपट आहे. कलाकार देखील अंतर्गत आहे, पटकथा देखील अंतर्गत आहे. त्यामुळे जोपर्यंत सिनेमाचा एन्ड होत नाही तोपर्यंत आम्ही काय प्रतिक्रिया द्यायची? पटकथेचा जेव्हा शेवट समजेल तेव्हा यावर प्रतिक्रिया देऊ, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.