बंगळुरू -कॉंग्रेसने गुरूवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मोदी भगवान हनुमानाचा उल्लेख करत असल्याविषयी त्या पक्षाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.
कर्नाटक निवडणुकीसाठी कॉंग्रेसने नुकताच जाहीरनामा प्रसिद्ध केला.
त्यामध्ये बजरंग दलासारख्या संघटनांवर बंदी घालण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यावरून भाजपने कॉंग्रेसला घेरले आहे. मोदींनीही कर्नाटकातील सभांमधून कॉंग्रेसवर टीकेची झोड उठवली. कॉंग्रेसने याआधी प्रभू श्रीरामांना कुलूपबंद केले. आता त्या पक्षाची जय बजरंगबली म्हणणाऱ्यांना कुलूपबंद करण्याची इच्छा आहे, असे त्यांनी म्हटले.
त्याशिवाय, त्यांनी सभांमध्ये जय बजरंगबली अशा घोषणाही दिल्या. त्याचा आधार घेऊन कॉंग्रेसने मुख्य निवडणूक अधिकाऱ्याकडे तक्रार दिली. प्रचारात हिंदू देव-देवतांचा उल्लेख करण्यापासून मोदींना रोखावे, अशी मागणी त्या पक्षाकडून करण्यात आली. काही वर्षांपूर्वी गोव्यात भाजपचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी श्रीराम सेने या संघटनेवर बंदी घातली.
त्यामुळे भगवान श्रीरामाचा अवमान झाला का? भाजपने शिवसेनेचा विश्वासघात केला. त्याकडे भगवान शिवाचा अवमान म्हणून पहायचे का, असे सवालही कॉंग्रेसने तक्रार देताना उपस्थित केले.