Bajar Samiti Election Resul 2023 – एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारत उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवरून खाली खेचलं. यानंतर त्यांनी पक्षावर दावा सांगत शिवसेना पक्ष व धनुष्यबाण हे निवडणूक चिन्हही आपल्या ताब्यात घेतलं. मात्र एवढं काही गमावल्यानंतर देखील उद्धव ठाकरे यांनी आपल्याकडे शिवसैनिक कायम असल्याचेच वारंवार सांगितले. ज्यांनी गद्दारी केली त्यांना जनता निवडणुकांमध्ये त्यांची जागा दाखवेल असे उद्धव ठाकरे प्रतयेक सभेत सांगतायेत.
राज्यात नुकत्याच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका पार पडल्या असून निकाल आज (शनिवार ता. २९) जाहीर करण्यात येत आहेत. उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना जनता त्यांची जागा दाखवेल या दाव्याचे बाजार समिती निवडणुकीच्या काही निकालांमध्ये प्रतिबिंब उमटल्याचे पाहायला मिळाले.
दादा भुसेंना मालेगावात धक्का… | Dada Bhuse Bajar Samiti Election Resul 2023
नाशिक-मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. दादा भुसे हे विद्यमान सरकारमध्ये मंत्री असून ते नाशिकचे पालकमंत्री देखील आहेत. दादा भुसे यांचा एकनाथ शिंदे यांच्या बंडात देखील सहभाग होता. अशात नाशिक-मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत दादा भुसे यांना मोठा धक्का बसला आहे. येथे शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांनी भुसे यांना पराभवाचे तोंड दाखवले आहे.
महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढलेल्या या निवडणुकीत अद्वय हिरे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने ११ पैकी १० जागा जिंकत मोठा विजय मिळवला आहे. भुसे यांच्या समर्थकांची बऱ्याच वर्षांपासून येथे सत्ता होती ती हिरे यांनी उलथवून टाकली आहे.
दिग्रसमध्ये संजय राठोड पराभूत | Sanjay Rathod Bajar Samiti Election Resul 2023
संजय राठोड हे यवतमाळचे पालकमंत्री असून त्यांच्या जिल्हातील बाजार समितीची निवडणूक लागल्याने याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. येथे महाविकास आघाडीने मोठा विजय मिळवला असून माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीने १८ पैकी १४ जागा जिंकल्या आहेत. राठोड यांच्या गटाला केवळ चार जागा मिळाल्या आहेत.
दिग्रसमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध एकनाथ शिंदे यांची शिवसेना व भाजप असा सामना पाहायला मिळाला. दोन्ही बाजूंकडून ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची करण्यात आली होती. बाजार समितीत सत्ताधारी असलेल्या माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांच्यापुढे देखील आपल्याकडील एकहाती सत्ता कायम ठेवण्याचे कडवे आव्हान होते.
मात्र महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ग्राउंड लेव्हलला एकदिलाने काम केल्याने येथे १८ पैकी १४ जाग्यांवर विजय मिळवण्यात यश आले. संजय राठोड यांच्या पदरी केवळ ४ जागा आल्या असून महाविकास आघाडीच्या वज्रमुठेने त्यांना चांगलाच ठोसा दिल्याचे पाहायला मिळाले.
संजय गायकवाडांना दणका… | Sanjay Gaikwad Bajar Samiti Election Resul 2023
बुलढाणा बाजार समितीची निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना ठाकरे गटाने महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढवली होती. या निवडणुकीचे निकाल हाती आले असून येथे १८ जागांपैकी १२ जागांवर माहाविकास आघाडीने विजय मिळवला आहे. या निवडणुकीत शिंदेंची शिवसेना व भाजप यांच्या युतीला अवघ्या 6 जागांवर समाधान मानावे लागले आहे.
येथे ठाकरे गटचे जालिंधर बुधवत यांनी पुन्हा एकदा विजयाचा झेंडा फडकवला आहे. तर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना महाविकास आघाडीच्या एकीने मोठा दणका दिला आहे.