सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजपला पराभावाचा धक्का बसला आहे. 18 पैकी 17 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर एका जागेवर अपक्ष उमेदवाराने विजय मिळवला आहे. या निवडणुकीत भाजपला मविआ आणि अपक्षांनी धूळ चारली आहे.
सांगलीतील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ही अत्यंत प्रतिष्टेची मानली जात होती. अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. दरम्यान, आज निकाल हाती आल्यानंतर सांगली बाजार समितीमध्ये भाजपला पराभवाचा धक्का बसला आहे.
या निवडणुकीमध्ये भाजपचे नेते कामगार मंत्री सुरेश खाडे, खासदार संजयकाका पाटील, माजी आमदार विलासराव जगताप यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.
तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री विश्वजित कदम आणि काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. अखेर महाविकास आघाडीने सांगलीत भाजपला धोबीपछाड करत एकहाती सत्ता मिळवली आहे.