पुणे-कसबा पेठ मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी दि. 26 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. हे मतदान समर्थ, खडक, विश्रामबाग, फरासखाना आणि दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत होणार आहे. यासाठी 76 मतदान केंद्रे असणार आहेत. तसेच दि. 24 फेब्रुवारी ते दि. 26 फेब्रुवारीपर्यंत राजकीय पक्षाशी संबंधीत कोणतीही व्यक्ती जी कसबा विधानसभा मतदार संघाची मतदार नाही, त्यांना मतदार संघात थांबण्यास आणि वास्तव्य करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या शंभर मीटर सभोवतालच्या परिसरात निर्बंध घालण्यात आले आहेत. या परिसरातील सर्व रेस्टॉरंट, टपऱ्या आणि व्यवसायीक दुकाने (अत्यावश्यक सेवा वगळता) बंद ठेवण्याचे आदेश सह पोलीस आयुक्त संदीप कर्णीक यांनी दिले आहेत.
या पोटनिवडणुकीची मतदान मोजणी दि. 2 मार्च रोजी दुपारी एक वाजल्यापासून सुरु होणार आहे. या ठिकाणीही काही प्रतिबंधात्मक आदेश काढण्यात आले आहे. त्यानूसार मतमोजणीच्या परिसरात हत्यारे किंवा परवानाधारक शस्त्र घेऊन फिरण्यात मनाई आहे. मोबाइल, खासगी ध्वनीक्षेपक तसेच खासगी वाहने आणण्यासही मनाई आहे.