मुंबई – महिलांच्या आयपीएल स्पर्धेचा लिलाव येथे सोमवारी पार पडला. त्यात अपेक्षेप्रमाणे भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधनाने सर्वाधिक कमाई केली. तिला रॉयल चॅलेंजर बंगळुरू (आरसीबी) संघाने तब्बल 3.40 कोटी रुपयांत खरेदी केली. तर महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला मुंबई इंडियन्सने 1.80 कोटींत आपल्याकडे घेतले.
स्मृती व हरमन यांची बेसप्राईज 50 लाख होती. स्मृतीवर मोठी बोली लागणार अशी असलेली अपेक्षा खरी ठरली. त्यामानाने हरमनला मोठी बोली लागली नाही. भारतीय महिलांच्या 19 वर्षांखालील विश्वकरंडक विजेत्या संघाची कर्णधार शफाली वर्माला दिल्ली कॅपिटल्सने 2 कोटी देत आपल्या संघात सामील करुन घेतले.
लक्षवेधी
– स्मृती मानधना 3.40 कोटी (आरसीबी)
– हरमनप्रीत कौर 1.80 कोटी (मुंबई इंडियन्स)
– ऑस्ट्रेलियाची ऍश्ले गार्डनर 3.20 कोटी (गुजरात)
– ऑस्ट्रेलियाची एलिस पेरी 1.70 कोटी (आरसीबी)
– दीप्ती शर्मा 2.60 कोटी (युपी वॉरिअर)
– इंग्लंडची नॅट शिवर 3.20 कोटी (मुंबई इंडियन्स)
– जेमिमा रॉड्रीक्स 2.20 कोटी (दिल्ली कॅपिटल्स)
– शफाली वर्मा 2 कोटी (दिल्ली कॅपिटल्स)
– लिलावात 15 देशांचे खेळाडू
– 24 खेळाडूंची 50 लाख बेसप्राईज
– स्पर्धेत केवळ पाच संघ
– मुंबई, दिल्ली, गुजरात, लखनौ व बंगळुरू
परदेशी खेळाडूंमध्ये ऑस्ट्रेलियाच्या ऍश्ले गार्डनरने 3.20 कोटी घेत बाजी मारली. तीला गुजरात टायटन्सने खरेदी केले. ऑस्ट्रेलियाचीच एलिस पेरी 1.70 कोटीत आरसीबीकडे गेली. या लिलावासाठी तब्बल 409 खेळाडूंची नावे नोंदवली गेली होती.
प्रत्येक संघ जास्तीत जास्त 18 तर किमान 15 खेळाडू खरेदी करू शकत असल्याने जास्त खेळाडू खरेदी करण्यापेक्षा स्टार खेळाडूंवर मोठी बोली लावत त्यांना आपल्या संघात घेण्याची चुरस जास्त दिसली.