इस्लामाबाद – तुर्कीये आणि सीरियाच्या सीमाभागात झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरून या भूकंपग्रस्तांसाठी मोठ्या प्रमाणात मदत पाठवली जाऊ लागली आहे. पैसे, मदत साहित्य, मदत आणि बचाव कर्मचारी आणि वैद्यकीय स्वरूपातही ही मदत दिली जाऊ लागली आहे. या भूकंपात मरण पावलेल्यांची संख्या आतापर्यंत 33 हजारांपेक्षा जास्त झाली आहे.
अजूनही अनेक भागात ढिगाऱ्यांखाली मृतदेह सापडत आहेत. त्यामुळे हा मृतांचा आकडा आणखीन वाढण्याचीही शक्यता आहे. अशातच एका अज्ञात पाकिस्तानी व्यक्तीने तुर्कीतील मदतकार्यासाठी तब्बल 30 दशलक्ष डॉलरचे अर्थसहाय्य केल्याचा दावा पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाझ शरीफ यांनी केला आहे. अमेरिकेतील तुर्कीच्या दूतावासाकडे ही मदत पाठवून देण्यात आल्याचे शेहबाझ शरीफ यांनी म्हटले आहे.
या अज्ञात पाकिस्तानी व्यक्तीने एवढी मोठी रक्कम तुर्कीला देताना आपले नाव गुप्त का ठेवले याचा उलगडा मात्र शेहबाझ शरीफ यांनी केला नाही. तसेच या व्यक्तीला तुर्कीला पाकिस्तान सरकारच्या माध्यमातून मदत का करावी असे वाटले नाही, याचे स्पष्टीकरण ते देऊ शकले नाहीत. मात्र, एका पाकिस्तानी व्यक्तीने तुर्कीला एवढी मोठी मदत केल्याची घोषणा केल्यावर त्याचे स्वागत होईल, अशी शेहबाझ शरीफ यांची अपेक्षा फोल ठरली. उलट नेटिझन्सनी या मुद्द्यावरून शरीफ यांना ट्रोल केले. या व्यक्तीला अगोदर आर्थिक अडचणीत सापडलेल्या स्वतःच्या देशाला, म्हणजे पाकिस्तानला मदत करावी, असे का वाटले नाही? असा प्रश्न आता विचारला जातो आहे.
Cyprus : सायप्रसच्या अध्यक्षपदी ‘निकोस ख्रिस्तोदोफाइड’ यांची निवड
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडूनही पाकिस्तानला अपेक्षित ती मदत मिळत नाही आहे. वीज, धान्य आणि इंधनाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. अशावेळी एखाद्या पाकिस्तानी व्यक्तीने आपल्या देशाची मदत करायला पाहिजे होती, ही स्वाभाविक अपेक्षा आहे.