नगर – अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांच्या समर्थनार्थ कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांनी पदाचा राजीनाम दिल्यानंतर लगेच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दुसऱ्याच दिवशी जिल्हा कॉंग्रेसची संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्याचे आदेश दिले. कॉंग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीवर पूर्णपणे कॉंग्रेसचे विधीमंडळाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांचे वर्चस्व आहे. त्याला धक्का देण्याचे काम पटोले यांनी केल्याने कॉंग्रेसमध्ये आणखीच उद्रेक वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, प्रभारी ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यावर टाकण्यात आली आहे.
पक्षात थोरातांचे वर्चस्व आहे. अध्यक्षासह अनेक पदाधिकारी त्यांचेच समर्थक आहेत. त्यामुळे ही कार्यकारिणी बरखास्त करून पटोले यांनी थेट थोरात यांनाच धक्का दिल्याचे मानले जात आहे. असे असले तरी आता या थोरात समर्थकांना उलट मोकळे रान प्राप्त झाल्याचे मानले जात आहे. तांबे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्यानंतर कॉंग्रेसने आमदार डॉ. सुधीर तांबे आणि नंतर सत्यजीत तांबे यांच्यावरही निलंबनाची कारवाई केली. मात्र, त्यानंतरही पक्षाच्याच अनेकांनी तांबे यांना पाठिंबा दिल्याने प्रदेश कॉंग्रेसकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला. सध्याच्या परिस्थितीत प्रचारापेक्षा अशी कारवाई करण्याचेच काम कॉंग्रेसला लागले की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. तांबे यांना पाठिंबा देण्यासाठी प्रदेश कॉंग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे राज्य उपाध्यक्ष नितीन शिवशरण यांनी राजीनामा दिला. तर जिल्हाध्यक्ष साळुंखे यांनी दैनिक “प्रभात’मध्ये तांबे यांना पाठिंब्याची भूमिका मांडली. त्यामुळे पक्षाने त्यांना नोटीस धाडली. त्या नोटीशीला उत्तर न देता साळुंखे यांनी आपला राजीनामाच सादर केला.
तर दुसरीकडे ज्या तारखेला साळुंखेचा राजीनामा आला त्याच तारखेने त्यांना पक्षातून निलंबित केल्याचे पत्रही आले. त्यामुळे राजीनामा आधी आला की निलंबनाची कारवाई? असा प्रश्न पडला असतानाच प्रदेश कॉंग्रेसकडून आणखी एक कारवाईचे पक्ष आले. या पत्रानुसार आता जिल्ह्याची पक्षाची संपूर्ण कार्यकारिणीच बरखास्त करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे यांनी जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केल्याचा आदेश काढला आहे. अध्यक्ष निलंबित आणि कार्यकारिणी बरखास्त अशी स्थिती झाल्याने ऐन निवडणुकीत जिल्ह्यात पक्षाची अवस्था बिकट झाली आहे. जिल्हा कार्यकारिणीत थोरात समर्थकांची संख्या अधिक आहे. दरम्यान, सध्या तरी जिल्हाध्यक्षविना कॉंग्रेस न ठेवता प्रभारी म्हणून शहरजिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यावर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी टाकण्यात आली आहे. दरम्यान लवकरच जिल्हाध्यक्ष नियुक्त करणार असल्याचे नाना पटोले म्हणाले.
पटोलेंनी नगरमध्ये केली घोषणा
जिल्हा कॉंग्रेस कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली. या पार्श्वभूमीवर शहर जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली नसून ती कायम ठेवण्यात आली आहे. शहर कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्याकडे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाचा प्रभारी पदभार देण्यात आल्याची घोषणा स्वतः प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नगरमध्ये महाविकास आघाडीच्या बैठकीत केली.