मुंबई – बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 236 अंकांनी कमी होऊन 60,621 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 0.44 टक्क्यांनी म्हणजे 80 अंकांनी कमी होऊन 18,027 अंकावर बंद झाला.
आज झालेल्या विक्रीचा फटका हिंदुस्तान युनिलिव्हर, एशियन पेंट्स, बजाज फायनान्स, नेस्ले, बजाज फिनसर्व, रिलायन्स इंडस्ट्रीज, लार्सन अँड टुब्रो, मारुती, इन्फोसिस, एअरटेल या कंपन्यांना बसला. हिंदुस्तान युनिलिव्हर या कंपनीचा शेअर चार टक्क्यांनी कोसळला.
पावर ग्रीड, एचडीएफसी बॅंक, एचडीएफसी, आयटीसी, टाटा मोटर्स, आयसीआयसीआय बॅंक, स्टेट बॅंक या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. दक्षिण कोरिया, जपान, चीन, हॉंगकॉंगमधील शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले होते. युरोपमधील शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले तर अमेरिकन शेअर बाजाराचे निर्देशांक कमी झाले होते.
परदेशी संस्थागत गुंतवणूकदाराकडून खरेदी सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे. गुरुवारी या गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात 399 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. त्या अगोदर एक महिन्यापासून हे गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातून गुंतवणूक काढून घेत होते.
जिओ जीत वित्तीय सेवा संस्थेचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले की, जागतिक मंदीच्या शक्यतेचा विविध बाजारावर परिणाम होणार आहे. अमेरिका व्याज दरात कमी प्रमाणात वाढ करणार असतानाच चीनमध्ये लॉकडाऊन समाप्त झाल्याच्या सकारात्मक घटना घडत आहेत. मात्र तरीही मंदीच्या शक्यतेमुळे गुंतवणूकदार सावध आहेत.
फेडरल रिझर्व व्याजदरात वाढ करणार असल्यामुळे भांडवलाचा वापर कमी होणे अपेक्षित आहे. आज झालेल्या विक्रीमुळे मिड कॅप 0.66 टक्क्यांनी, स्मॉल कॅप 0.50 टक्क्यांनी कमी झाला. त्याचबरोबर दूरसंचार, ग्राहक वस्तू, धातू, रिऍल्टी या क्षेत्राचे निर्देशांक कमी झाले. तर ऊर्जा, वित्तीय सेवा, बॅंकिंग क्षेत्राचे निर्देशांक काही प्रमाणात वाढले.