मुंबई – अॅक्टिंग, मॉडेलिंग आणि जाहिरातींमध्ये काम करणारी अभिनेत्री ‘उर्फी जावेद’ ही तिच्या हटके फॅशनमुळे चर्चेत असते. उर्फी ही अतरंगी लूक करुन फोटोशूट करते. तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट अनेकांचे लक्ष वेधतात. अनेक लोक उर्फीला त्यामुळे ट्रोल करतात तर काही जण तिचं कौतुक करतात.
दरम्यान, भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदला बेड्या ठोका, अशी मागणी दोन दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांकडे केली. स्वतः चित्रा वाघ यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेत उर्फी जावेदवर तात्काळ कायदेशीर कारवाई करा असं म्हंटल होत. या संदर्भातील एक पोस्ट देखील त्यांनी आपल्या अधिकृत ट्विट आकाउंटवर शेअर केली होती.
या पोलीस तक्रारीनंतर उर्फी व चित्रा वाघ यांच्यात चांगलाच वाद सुरू झाला आहे. त्यानंतर चित्रा वाघ यांनी ‘उर्फी मला कुठे दिसली, तर तिला मी थोबडवून काढेन’ असं विधान केलं होतं. चित्रा वाघ यांच्या या वक्तव्यावर आता उर्फीने दिल्लीच्या घटनेचा व्हिडीओ शेअर करत उत्तर दिलं होतं. तसेच, आपल्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट करत उर्फीने भीती व्यक्त केली आहे.
आपल्या इंन्स्टाग्राम स्टोरी यामध्ये उर्फी म्हणाली की, “राजकारण्यांविरोधात वक्तव्य करणं माझ्यासाठी घातक ठरू शकते, हे मला माहीत आहे. पण ते मला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत आहेत. त्यामुळे एकतर मी आत्महत्या करेन किंवा त्यांच्याविरोधात बोलून मी माझं जीवन संपवेल. पण या सगळ्याची सुरुवात मी केलेली नाही. मी कोणाबरोबरही काहीच चुकीचं वागलेले नाही. काहीही कारण नसताना त्यांनी या सगळ्याची सुरुवात केली आहे.” असं तिने म्हटलं आहे. सध्या उर्फीची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.