मुंबई – कंपन्यांनी वितरकांना विकलेल्या वाहन विक्रीत नोव्हेंबर महिन्यात 28 टक्के वाढ झाली. प्रवासी वाहनाबरोबरच व्यवसायीक वाहनांच्या विक्रीत वाढ झाली असल्याचे वाहन उत्पादकाची संघटना असलेल्या सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स या संघटनेने म्हटले आहे.
नोव्हेंबर महिन्यात प्रवासी वाहनांची विक्री 29 टक्क्यांनी वाढून 1,30,142 इतकी झाली आहे. गेल्या वर्षी या महिन्यामध्ये 1,00,906 वाहनांची विक्री झाली होती. या संघटनेचे अध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी सांगितले की, ग्राहकांना पाहिजे ते वाहने आता उपलब्ध होत आहेत. अर्थव्यवस्था सुधारत असल्यामुळे शहरातील ग्राहकांची क्रयशक्ती वाढली असल्यामुळे विक्री वाढत असल्याचे दिसून येत आहे.
मात्र व्याजदर जास्त आहेत. त्याचबरोबर विम्याचा खर्च वाढत असल्यामुळे छोट्या वाहनाच्या खरेदीवर काही प्रमाणात परिणाम होत असल्याचे सांगण्यात आले. नोव्हेंबर महिन्यात दुचाकी वाहन विक्री 16 टक्क्यांनी वाढून 12,36,190 इतकी झाली आहे.