करोनाचा मोठा फटका : वाहनविक्रीत तब्बल 42 टक्‍क्‍यांची घट

गेल्या वर्षीच्या तुलनेत अवघी 55 टक्‍के दुचाकी नोंदणी

पिंपरी – करोनाचा खूप मोठा फटका वाहन निर्मिती क्षेत्रातील सर्वच उद्योगांना बसला आहे. तसेच सरकारच्या उत्पन्नातही मोठी घट झाली आहे. वर्ष 2019-20 एप्रिल ते जानेवारीच्या तुलनेत पिंपरी-चिंचवड आरटीओ कार्यालयात 2020-21 एप्रिल ते जानेवारी या काळात तब्बल 42 टक्‍क्‍यांनी वाहन नोंदणी कमी झाली आहे.

पिंपरी-चिंचवड शहर हे पूर्वीपासून ऑटोमोबाइल हब म्हणून ओळखले जाते. या शहरात दुचाकी आणि चारचाकी बनविणाऱ्या देश-विदेशातील बड्‌या कंपन्या आहेत. तसेच या कंपन्यांना सुटे भाग पुरविणारे हजारो मध्यम, लघु आणि सूक्ष्म उद्योगही आहेत. याच उद्योगांमुळे या शहराला उद्योगनगरी असे नाव मिळाले. देशभरात विकल्या जाणाऱ्या कोट्यवधी वाहनांपैकी लाखो वाहने या शहरात आहेत. परंतु या शहरात बनणाऱ्या वाहनांची या शहरात आणि आसपासच्या परिसरात विक्री कमी झाली आहे.

विक्रीमध्ये एवढी मोठी घट यापूर्वी कधीच आली नसून ही पहिली वेळ असल्याचे सांगण्यात येत आहे. भीषण मंदीच्या काळातही आरटीओकडील वाहन नोंदणीमध्ये एवढी मोठी पहावयास मिळाली नाही.
आरटीओ कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार वर्ष 2019-20 एप्रिल ते जानेवारीच्या तुलनेत पिंपरी-चिंचवड आरटीओ कार्यालयात 2020-21 एप्रिल ते जानेवारी या काळात दुचाकीच्या नोंदणीत 45 टक्‍के घट झाली आहे. तर हलक्‍या चार चाकी वाहनांच्या नोंदणीत 21 टक्‍के घट झाली आहे.

तसेच इतर वाहनांच्या नोंदणीमध्ये 61 टक्‍के घट नोंदविण्यात आली आहे.नोंदणीत घट अर्थातच विक्रीत घट झाली असल्याचे स्पष्ट आहे. करोना काळात लॉकडाऊन झाल्याने 23 मार्च ते 18 जून दरम्यान आरटीओ बंद होते. या काळात वाहन खरेदी-विक्री आणि नोंदणी झाली नाही. यामुळे नोंदणीची आकडे कमी झाले हे जरी खरे असले तरी त्यांनंतरच्या काळातही म्हणावी तेवढी वाहन विक्री व नोंदणी झाली नाही. गेल्या दोन वर्षांपासून देशातील वाहन विक्रीत घट होत असल्यामुळे वाहन निर्मिती उद्योग काहीसा अडचणीत होता. त्यानंतर करोनाने या उद्योगाचे मोठे नुकसान झाले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.