बेलसर -बेलसर-उरुळी कांचन रस्ता मागील अनेक वर्षांपासून वादाचा मुद्दा ठरत आहे. त्यातच बेलसर (ता. पुरंदर) येथे मध्यरात्री 1.15 वाजता डंपर चालकाच्या थरारात अवघ्या 15 सेकंदांत दोन दुकानांचा चक्काचूर झाला आहे. या दोन दुकानांचे अंदाजे पाच लाखांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, सीसीटीव्हेद्वारे डंपरने हे कृत्य केल्याचे कैद झाले असले तरी नंबर दिसलेला नाही. तर याबाबत जेजुरी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
बेलसर येथील नजीर अमीर मुजावर यांच्या सानिया ब्युटी पार्लर अँड बॅंगल स्टोअर, जनरल स्टोअर्स तसेच सादिक बाषु मुजावर यांच्या बिस्मिल्लाह चिकन सेंटरवर मध्यरात्रीच्या सुमारास बेधुंद डंपर चालक भरधाव वेगाने वळण न बसल्याने थेट दोन्ही दुकानात जाऊन शिरला. अगदी कमी वेळात म्हणजे जवळपास 15 ते 20 सेकंदात त्याने तेथून गाडी रिव्हर्स घेऊन पळ काढला आहे. बसलेली धडक हे अत्यंत भयानक होती विजेच्या तारा तुटून त्याच्या ठिणग्या जमिनीवर पडल्या होत्या.
मागील अनेक वर्षांपासून रेंगाळत पडलेला तसेच प्रशासनाचे दुर्लक्ष असलेला बेलसर उरळीकांचन रस्ता अनेक अपघातांसाठी प्रसिद्ध आहे. मागील अनेक वर्षांपासून गावकऱ्यांचे आंदोलने, वाहनांचे अपघात अनुभवलेला रस्ता म्हणून या रस्त्याची ओळख आहे. तसेच राजकीय नेतेमंडळी आणि बांधकाम विभागाकडून अनेक आश्वासनाच्या पोळ्या भाजून त्या तशाच हवेत तरंगत ठेवण्यासाठी हा रस्ता प्रसिद्ध मानला जातो. रस्ता हा अनेक वर्षांपासून रखडलेला रस्ता आहे;
परंतु अलीकडील काळामध्ये रस्ता तात्पुर्ता पूर्ण झाला आहे; परंतु त्यावर एकच लेअर डांबरीकरण करण्यात आले आहे. अद्याप दुसरे डांबरीकरण करण्यात येणार आहे; परंतु रस्ता चांगला झाल्याच्या समजामुळे अनेक वाहनचालक भरधाव वेगाने या रस्त्यावर वाहने चालवत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघातात वाढ झाली आहे; रस्त्यावर कुठलीही वेगाची मर्यादा नसते त्यामुळे अपघात होत आहेत. घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक तात्यासाहेब खाडे, पोलीस हवालदार पिंगळे करीत आहेत.
तर मोठी दुर्घटना घडली असती
झालेला अपघात हा बालसिद्धनाथ विद्यालय बेलसरपासून अगदी जवळ झाला आहे. दिवसा या भागात बहुसंख्य शालेय विद्यार्थ्यांची वर्दळ असते, जर दिवसा अपघात झाला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी साईकृपा कॉम्प्लेक्स समोर तसेच आंबेडकर पुतळ्यासमोर व बालसिद्धनाथ शाळेच्या पाठीमागे गतिरोधक टाकण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
डंपरमध्ये नक्की काय होते?
अवघ्या 15 सेकंदात डंपर चालकाने केलेल्या चालाकीमुळे डंपर चालक पसार झाला आहे. त्वरित रिव्हर्स गिअर टाकून चालक डंपर घेऊन पळून गेला. तर डंपरमध्ये नक्की काय होते? तो लगेच पळून का गेला? तर डम्परमध्ये इतर काही साहित्य होते का? अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये रंगत आहे.