बारामती -राष्ट्रीय गणित दिवस, विद्या प्रतिष्ठानचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आणि शरद पवार यांचा वाढदिवस असा तिहेरी योग साधून विद्या प्रतिष्ठान इंग्रजी माध्यम विद्यालयाने “बारा तासांची गणितीय मॅरेथॉन’ हा अनोखा उपक्रम राबवला. उपक्रमात 200 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सकाळी सात ते संध्याकाळी सात असे सलग बारा तास गणित सोडवत मुलांनी हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडला.
कार्यक्रमाचे उद्घाटन विद्याप्रतिष्ठान कमल नारायण बजाज इंजिनिअरिंग कॉलेजचे गणित विभाग प्रमुख डॉ. अनिल हिवरेकर यांनी केले. यावेळी प्राचार्या राधा कोरे, गणित विभागप्रमुख साधना हुल्याळकर, गणित शिक्षक- शिक्षिका उपस्थित होत्या.
डॉ. हिवरेकर म्हणाले की, वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणे सोडवल्याने विद्यार्थ्यांमध्ये जीवन मूल्यांचा विकास होतो, जसे समस्या सोडवणे, आत्मविश्वास, सहनशीलता व्यक्तिमत्व या सर्वांचा विकास होतो.
वेगवेगळ्या प्रकारचे कूट प्रश्न सोडवल्याने मुलांच्या विचारशक्तीला चालना मिळते. त्यांच्या सुप्त गुणांचा विकास होतो म्हणून असे प्रश्न सोडवण्यास जरी कठीण वाटले तरी असे प्रश्न सोडवण्याचा जरूर प्रयत्न करावा. प्राचार्या राधा कोरे यांनी मार्गदर्शन केले. गणितातील उदाहरणे सोडवण्याबरोबर वेगवेगळ्या गणितीय कलाकृती, गणितीय चित्रे, गणितीय संगीत, गणितीय प्रश्नमंजुषा या वेगवेगळ्या स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले.
यावेळी सर्व विद्यार्थ्यांना विविध प्रकारची गणितीय संदर्भ असणारी दोन हजार पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली. उपक्रमाचे नियोजन प्राचार्या राधा कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गणित विभाग प्रमुख साधना हुल्याळकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व सेवकांनी परिश्रम घेतले. हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडून मुलांमध्ये असणारी गणिताची भीती कमी करण्याचा विद्यालयाने प्रयत्न केल्याची प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केली.