पुणे – भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेला संस्कृत आणि प्राकृत भाषेतील दुर्मिळ पुस्तके आणि हस्तलिखितांचे जतन आणि संशोधन करण्यासाठी मूर्ती ट्रस्टचे सुधा मूर्ती आणि नारायण मूर्ती यांच्याकडून साडेसात कोटी रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली. या अनुदानातून उभारण्यात येणाऱ्या इमारतीचे भूमिपूजन सुधा मुर्ती यांच्या हस्ते करण्यात आले.
सुधा मूर्ती म्हणाल्या, “भांडारकर प्राच्यविद्या संशोधन ही 105 वर्षे जुनी संस्था असून, भारताच्या सांस्कृतिक वारशाचा प्रमुख आधारस्तंभ आहे. संस्थेने बौद्धिक शोधनिबंध आणि पुस्तकांची भरपूर निर्मिती केली आहे. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेमधील प्रत्येक प्राध्यापक महान विद्वान आहेत. “महाभारताची चिकित्सा आवृत्ती’ आणि “काणे यांचे धर्मशास्त्र’ या दोन पुस्तकांच्या बौद्धिक कार्याने मी भारावून गेले. ही दोन्ही पुस्तके माझ्या मनाला खूप भावली आहेत.’
काळ बदलला तसे आता लोकांना आपल्या संस्कृतीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी ऑनलाइन वर्ग हवे आहेत. या क्षेत्रातील जाणकारांशी संवाद साधायची इच्छा आहे. म्हणूनच मूर्ती ट्रस्टने भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेसाठी भारताचा सांस्कृतिक वारसा साजरा करण्यासाठी समर्पित असलेली एक नवीन आणि आधुनिक इमारत बांधून देण्याचे ठरवले आहे, असे मूर्ती म्हणाल्या. संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन म्हणाले, “मूर्ती सेंटर ऑफ इंडिक स्टडीज 60 हून अधिक विद्वानांना सामावून घेऊ शकते. या संशोधन संस्थेने आता शिक्षणकार्यातही प्रवेश केला आहे. संस्थेकडे हस्तलिखिते आणि जुनी पुस्तके आहेत. ही पुस्तके जतन करण्यासाठी नवीन इमारतीत एक संवर्धन प्रयोगशाळा असणार आहे.’
अशी असेल इमारत
18 हजार चौरस फूट हेरिटेज शैलीची, 200 आसन क्षमता असलेली शैक्षणिक आणि संशोधन इमारत असणार आहे. त्यामध्ये व्याख्याने आयोजित करण्यासाठी एक अत्याधुनिक सभागृह आणि प्राचीन पुस्तके आणि हस्तलिखिते डिजिटाइज करण्यासाठी दृकश्राव्य स्टुडिओ असलेल्या मूर्ती सेंटर ऑफ इंडिक स्टडीजचे बांधकाम समाविष्ट आहे.