नवी दिल्ली – जागतिक बाजारात सोने आणि चांदीचे दर वाढत आहेत. त्यामुळे भारतीय सराफात सोने आणि चांदीच्या दरात वाढ नोंदली गेली. दिल्ली सराफात सोन्याचा भाव 227 रुपयांनी वाढून 54,386 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 1,166 रुपयांनी वाढून 67,270 रुपये प्रति किलो झाला.
सध्या जागतिक बाजारात सोन्याचे दर वाढत आहेत, त्याबद्दल एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक दिलीप परमार यांनी सांगितले की, अमेरिकेत व्याजदर वाढ कमी होणार असल्यामुळे डॉलर कमकुवत होत आहे. त्याचबरोबर अमेरिकेच्या कर्जरोख्यावरील परतावा कमी होताना दिसून येत आहे. अशा परिस्थितीत बरीच गुंतवणूक सोने आणि चांदीकडे वळत असल्यामुळे गेल्या आठवड्यापासून सोने आणि चांदीचे दर वाढत असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी एकूण परिस्थिती पाहता आक्रमक व्याजदर वाढ करण्याची गरज दिसत नसल्याचे स्पष्ट केले होते. त्याचबरोबर या अगोदर झालेल्या फेडरल रिझर्व्हच्या पतधोरण समितीच्या इतिवृत्तामध्ये बऱ्याच सदस्यांनी मंदी कमी करण्यासाठी आक्रमक व्याज दरवाढ टाळावी अशी सूचना केलेली आहे. त्यानंतर डॉलर आणि अमेरिकेच्या कर्जरोख्यावरील परतावा कमी होत असल्याचे दिसून येत आहे.