बॅंकॉक, (थायलंड) – थायलंडने चिनी पाणबुडी खरेदीसाठी चीनबरोबर केलेल्या करारातून माघार घेण्याचा इशारा दिला आहे. ( Thailand planning to cancel Submarine deal with China ) जर या खरेदी करारातील अटींचे पालन चीनकडून झाले नाही, तर या करारातून बाहेर पडण्याची आपली तयारी आहे, असे थायलंड सरकारने पुन्हा एकदा म्हटले आहे. थायलंडच्या नौदल प्रमुख ऍडमिरल चोएंगचाय चोमचोएनपाएत यांनी सांगितले.
2017 मध्ये चीनच्या सरकारी कंपनीकडून 13.5 अब्ज बाहत (थायलंडचे चलन) इतक्या किंमतीला पाणबुडी खरेदी करण्याचे मान्य केले होते. ही पाणबुडी थायलंडला 2023 पर्यंत मिळणे अपेक्षित होते. या पाणुडीमध्ये जर्मन बनावटीचे इंजिन बसवले जावे, असे करारामध्ये म्हटले होते. मात्र चीनला लष्करी उपकरणांची विक्री करण्यासयुरोपीय संघाच्या संसदेने प्रतिबंध केल्यामुळे हे इंजिन चीनला विकण्यास जर्मनीने नकार दिला.
जर्मनीकडून हे इंजिन न मिळाल्यामुळे या पाणबुडीच्या बांधणीचे काम थांबले होते. त्यामुळे चिनी कंपनीने थायलंडच्या पाणबुडीमध्ये चिनी इंजिन बसवण्याचा प्रस्ताव तायलंडसमोर ठेवला. याशिवाय थायलंडला चिनी नौदलाच्या सेवेतून बाद झालेल्या दोन बोटी देण्याची तयारीही चिनी कंपनीने दाखवली होती.
मात्र थायलंड सरकारने हा प्रस्ताव फेटाळून लावला आणि जर्मन इंजिन बसवण्याचा आग्रह कायम ठेवला. त्यावर चिनी कंपनीने कोणत्याही गॅरंटीशिवाय चिनी इंजिन बसवण्याची तयारी दाखवली. यामुळे थायलंड सरकार अधिकच संतापले. अशी तडजोड करून गुणवत्ताहीन पाणबुडी स्विकारण्याऐवजी चीनबरोबरचा पाणबुडीविषयक करारच अमान्य केला जावा, असे मत आता थायलंड सरकारने केले आहे.