Sanju Samson – भारतीय संघातीळ खेळाडू संजू सॅमसनकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याची भावना क्रिकेट चाहत्यांच्या मनात निर्माण झाली आहे. याबाबत बोलताना पाकिस्तानचा माजी फिरकी गोलंदाज दानिश कनेरियाने प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना कनेरियाने बीसीसीआय आणि निवड समितीवर जोरदार टीका केली आहे. त्याचे म्हणणे आहे की, काही वर्षांपूर्वी अंबाती रायडूला जी वागणूक दिली होती, त्याचप्रकारे भारतीय क्रिकेट सध्या संजू सॅमसनशी ( Sanju Samson ) करताना दिसत आहे. संघात निवड होत नसल्याने अखेर रायडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.” रायडूने २०१९ च्या विश्वचषक संघात निवड न झाल्यानंतर लगेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता. रायडूप्रमाणे संजू सॅमसनचे करिअरही अशाच प्रकारे उध्वस्त होण्याचे भाकीत दानिश कनेरियाने व्यक्त केले आहे.
#RogerBinny | बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी सुनेमुळे अडचणीत
दानिश कनेरिया म्हणाला की, “२०१९च्या विश्वचषकादरम्यान अंबाती रायडूची संघातील निवड होणार हे नक्की मानले जात होते. त्यावेळी त्याचा फॉर्म पाहता चौथ्या क्रमांकासाठी त्याची संघातील निवड एकदम पक्की झाली होती. मात्र निवड समितीने रायडूऐवजी अष्टपैलू विजय शंकरला संघात स्थान दिले. यानंतर निराशेच्या गर्तेत बुडालेल्या अंबाती रायडूने बीसीसीआयला पत्र लिहून थेट निवृत्ती जाहीर केली. आपली निवड न होणे आणि विजय शंकरला संघात स्थान मिळणे, याबाबत रायडूने नाराजीही व्यक्त केली होती.”
संजू सॅमसनबद्दल बोलताना कनेरियाने म्हटले की, ” संजू सॅमसन ( Sanju Samson ) अप्रतिम फलंदाजी करतो, मग त्याला संघात संधी का दिले जात नाही? खेळाडू किती सहन करू शकतो? तो आधीच खूप सहन करत आहे आणि त्याला जिथे संधी मिळते तिथे तो चांगली कामगिरी करतो. त्याला वारंवार डावलले तर आपण एक चांगला खेळाडू गमावू शकतो. अंबाती रायुडूची कारकीर्दही अशाच प्रकारे संपुष्टात आली. त्यानेही खूप धावा केल्या होत्या पण संघात संधी मिळत नव्हती.”
कनेरियाने बीसीसीआयबद्दल बोलताना म्हटले की, “बोर्डामध्ये राजकारण सुरू आहे आणि या अंतर्गत राजकारणामुळे सॅमसनला संधी दिली जात नाही. अशामुळेच अंबाती रायडूची कारकीर्द उध्वस्त झाली. त्यानंतर आता संजू सॅमसनला देखील त्याचप्रकाराची वागणूक दिली जात आहे. कारण आहे बीसीसीआय आणि निवड समितीचे अंतर्गत राजकारण. खेळाडूंबद्दलही काही आवडी-निवडी किंवा पसंती-नापसंती असतात का?”, असा सवालही कनेरियाने केला आहे.