नवी दिल्ली – चिनी वस्तू वापरण्याविरोधात देशात वातावरण तयार झाले आहे. त्याला हीरो सायकलने पाठिंबा दर्शविला आहे. ही कंपनी चीनमधून 900 कोटी रुपयांच्या सायकल आणि सायकलचे काही सुटे भाग आयात करणार होती. मात्र आता या कंपनीने हा व्यवहार रद्द केला आहे.
कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पंकज मुंजाळ यांनी सांगितले की, चीनने सरद्दीवर केलेल्या हिंसाचारामुळे देशातील वातावरण गढूळ झाले आहे. अशा परिस्थितीत चीन बरोबर व्यवहार करणे बरोबर होणार नाही. यासाठी आम्ही हे सुटे भाग चीनऐवजी इतर देशांकडून उपलब्ध करण्याचा प्रयत्न करणार आहोत. या दृष्टिकोनातून जर्मनीतील काही कंपन्यांशी आम्ही संपर्क साधला असून आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. हीरो सायकल लवकर युरोपात आपले उत्पादन केंद्र सुरू करणार आहे. त्याची पूर्ण तयारी झाली आहे. आगामी काळात भारतात आणि परदेशात सायकलची मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्या दृष्टिकोनातून उत्पादन वाढविण्यावर आम्ही विचार करीत आहोत, असे मुंजाळ यांनी सांगितले.
एमएमआरडीए सक्रिय…
मुंबई मेट्रोपॉलिटन रिजीन डेव्हलपमेंट ऍथॉरीटीने मुंबई मोनोरेल प्रकल्पासाठी चिनी कंपन्यांना 500 कोटी रुपयांचे कंत्राट दिले होते. मात्र हे कंत्राट रद्द करण्यात आले आहे. हे काम करण्यास भारत हेवी इलेक्ट्रिकल, भारत अर्थ मुव्हर्स या कंपन्यांनी तयारी दर्शविली आहे. देशभरात चीन विरोधात वातावरण तयार झाल्यामुळे सरकारीकंपन्यानी चिनी कंपन्यांबरोबरचे करार रद्द करीत आहेत. यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.