नवी दिली : देशात सध्या गुजरात निवडणुकीमुळे भाजप आणि आम आदमी पक्ष एकमेकांवर आरोप करताना पाहायला मिळत आहे. त्यातच दिल्लीतही या दोन्ही पक्षांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला असल्याचे दिसून येत आहे. भाजपाने आजच मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी तिहार तुरुंगात बंद असलेले आपचे मंत्री सत्येंद्र जैन यांचा एक व्हिडीओ जारी केला आहे. या व्हिडीओमध्ये तुरुंगात असलेल्या जैन यांना विशेष सेवा पुरवल्या जात असल्याचा दिसून येत आहे, असा आरोपच भाजपकडून करण्यात आला आहे.
दिल्लीच्या केजरीवाल सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन यांचे तुरुंगातील सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सत्येंद्र जैन सेलमध्ये मसाज करताना दिसत आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये सत्येंद्र जैन बेडवर पडून पेपर वाचताना दिसत आहेत तर एक माणूस त्याच्या पायाला मालिश करताना दिसत आहे. व्हायरल फुटेजवर तिहार तुरुंगातून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
तिहारमधील सुत्रांच्या हवाल्याने एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिलेल्या वृत्तानुसार हा व्हिडीओ जुना आहे. तुरुंग प्रशासनाने पूर्वीच संबंधित अधिकाऱ्याविरोधात आणि तुरुंग प्रशासनातील कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई केली आहे. आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी दिल्लीचे आरोग्यमंत्री असलेल्या सत्येंदर जैन यांना अंमलबजावणी संचालनालयाने ३० मे रोजी अटक केली. यापुर्वीही जैन यांना विशेष सुविधा तुरुंगामध्ये पुरवल्या जात असल्याचे आरोप करण्यात आले होते. डोक्याला मसाज, पायाला मजास करुन देण्याबरोबर पाठ चोळून देण्यासारख्या विशेष सेवा त्यांना तुरुंगातील कर्मचाऱ्यांकडून पुरवल्या जात होत्या. ईडीने या आरोपांसंदर्भातील पुरावेही न्यायालयामध्ये सादर केले होते.
#WATCH | CCTV video emerges of jailed Delhi minister Satyendar Jain getting a massage inside Tihar jail. pic.twitter.com/VMi8175Gag
— ANI (@ANI) November 19, 2022
“अनोखळी लोक त्यांना कोठडीमध्ये मसाज आणि फूट मसाज देत असल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे कर्फ्यू अवर्स (तुरुंग प्रशासनाचं दैनंदिन काम संपल्यानंतर) या सेवा दिल्या जात होता. त्यांना वेगळं जेवणही दिलं जातं,” असे अतिरिक्त सॉलिसीटर जनरल एस. व्ही राजू यांनी ईडीची बाजू न्यायालयासमोर मांडताना म्हटलं होतं. यावेळेस त्यांनी सीसीटीव्ही फुटेज न्यायालयासमोर सादर केले. जैन हे अनेकदा रुग्णालयात दाखल असतात किंवा कोठडीत असताना अशा विशेष सेवा त्यांना दिल्या जातात असं ईडीने म्हटलं आहे. ५८ वर्षीय जैन हे ३० मे पासून पोलिसांच्या ताब्यात आहेत.
“तुरुंगामध्ये व्हीव्हीआयपी सेवा. अशा मंत्र्याची बाजू केजरीवाल घेणार का? त्यांना पदावरुन हटवलं पाहिजे की नाही? यावरुन आपचा खरा चेहरा समोर येत आहे,” असं भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनी ट्वीटवरुन म्हटलं आहे. त्यांनी दोन व्हिडीओ शेअर केले असून एकामध्ये जैन यांना मसाजची सेवा दिली जात असल्याचं दिसतंय तर दुसऱ्यात जैन यांना पाय चोळून दिले जात असल्याची दिसत आहे.